डोंबिवली – डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी मंगळवारी अचानक येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन पक्षाचे डोंबिवली शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांचे खंदे समर्थक प्रकाश तेलगोटे यांची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे पदाधिकाऱ्याने ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीने होणार आहे. प्रत्येक पक्षाला समझोत्याचे धोरण ठेऊन आपले उमेदवार ठरविणे, समविचारी पक्षाशी समन्वय ठेऊन उमेदवार निश्चिती आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
दोन्ही ठाकरे बंधू लवकरच एकत्र येतील अशाही चर्चाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी रखडलेल्या पलावा पुलाचे काम लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करा या मागणीसाठी निषेध मोर्चा काढला होता. शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीने बेजार प्रवाशांच्या हिताचा हा विषय असल्याने ठाकरे गटाचा मोर्चा असुनही मनसेचे माजी आमदार राजू पाटील या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. कल्याण ग्रामीणचे विद्यमान शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी पलावा पूल ३१ मेपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या कालावधीत पूल सुरू न झाल्याने त्याचा जाब विचारण्यासाठीही हा मोर्चा होता.
ठाकरे गट आणि मनसे मनोमिलनाच्या घडामोडी मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे शहराध्यक्ष राहुल कामत यांनी ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाला अचानक भेट दिली. ठाकरे गटाच्या कार्यालयात डोंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी शहरप्रमुख कामत यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ठाकरे, मनसे गटातील महिला, पुरूष कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या भेटीनंतर दोन्ही शहरप्रमुखांमध्ये डोंबिवली शहरातील नागरी प्रश्न, समस्या या विषयावर चर्चा झाली. काही वेळ या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी बंद दाराआड चर्चा केली. ही चर्चा आगामी पालिका निवडणुका की अन्य काही विषयावर केली याविषयी समजू शकले नाही.
ही सदिच्छा भेट होती. यामागे कोणतेही कारण, राजकारण नव्हते. डोंबिवली शहरातील नागरी समस्या, विकासाचे विषय याविषयी आम्ही चर्चा केली. – राहुल कामत, शहराध्यक्ष, मनसे डोंबिवली.
मनसे शहरप्रमुख कामत आमच्या कार्यालयात आले. आम्ही त्यांचे स्वागत केले. यामध्ये कोणतेही राजकारण नव्हते. डोंबिवलीत अनेक नागरी समस्या आहेत. विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. ते पाठपुरावा करून कसे पूर्ण होतील. लोकांना दिलासा मिळेल या दृष्टीने आम्ही चर्चा केली. – प्रकाश तेलगोटे, शहरप्रमुख, ठाकरे गट, डोंबिवली.