ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी २०२९ पर्यंत कुठेही जाणार नाही असे म्हटल्यानंतर आता मनसेचे नेते, माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. ‘उप’ यांनी आता ‘चूप’ बसावे असे म्हणत टोला लगावला. नेमके राजू पाटील काय म्हणत आहेत ते पाहूया.

मी २०१९ पर्यंत महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.”मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू शकतो, २०१९ पर्यंत मी महाराष्ट्रातच असेन. त्यानंतर पक्षाचा निर्णय असेल,” असे फडणवीस यांनी नागपूरमध्ये अनौपचारिक भेटीत पत्रकारांना नुकतेच सांगितले होते. यानंतर मनसेचे नेते राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसेच उप यांनी आता चूप बसावे असे म्हणत शिंदे यांना टोला लगावला.

मनसे आणि शिंदे गटात वाद

– लोकसभा निवडणूकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यानंतर मनसेच्या कल्याण, डोंबिवली येथील पदाधिकाऱ्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये काम करावे लागले. राज ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी एक सभा देखील घेतली होती. राजू पाटील यांनी स्वत: श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात पुढाकार घेतला होता. विधानसभा निवडणूकीत मनसेने महायुतीसोबत निवडणूक लढविली नाही. या निवडणूकीत शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांनी राजू पाटील यांचा दारून पराभव केला. राजू पाटील यांच्या पराभवानंतर कल्याण डोंबिवली भागात दोन्ही पक्षामध्ये आता प्रचंड मतभेद निर्माण झाले आहेत.

राजू पाटील यांची टीका काय

– राजू पाटील यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यमावर टीका करत ‘मी कुठेही जात नाही. मुख्यमंत्रीपदासाठी २०२९ पर्यंत तरी कोणतीही व्हॅकेन्सी नाही’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मी पुन्हा मुख्यमंत्री होणारच असा दावा करणारा ‘उप’ एका वाक्यात ‘चुप’ असे म्हणाले. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत पुन्हा टीका केली. ‘आपले माजी मुख्यमंत्री सतत सांगत असतात मी पुन्हा मुख्यमंत्री होणार. याची चाहूल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लागली आहे. त्यामुळे त्यांनी घोषित करुन टाकले २०२९ पर्यंत मीच मुख्यमंत्री आहे.’ त्यामुळे उप यांनी आता चुप बसावे असे राजू पाटील म्हणाले.