कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शन जवळील निळजे रेल्वे उड्डाण पुलाचे काम समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाकडून ५ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते १० फेब्रुवारी रोजी रात्री १२ या पाच दिवसांच्या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत शिळफाटा रस्त्यावर पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. यासंदर्भातची अधिसूचना शुक्रवारी प्रसिध्द केली जाणार आहे, असे ते म्हणाले. दिल्ली ते जेएनपीटी समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. हा रेल्वे मार्ग शिळफाटा येथे पलावा जंक्शन एक्सपेरिया माॅलजवळील निळजे रेल्वे उड्डाण पुलाखालून जाणार आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुच्या पृष्ठभागालगतचे भरावाचे काम पूर्ण झाले आहे. विभागाकडून निळजे रेल्वे मार्गावरील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिळफाटा रस्त्यावरील सततच्या वाहन वर्दळीत ही कामे करणे शक्य नसल्याने रेल्वेने पाच दिवस पलावा जंक्शनकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक पाच दिवस बंद ठेऊन ही कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी ५ ते १० फेब्रुवारी या कालावधीत शिळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शनकडे जाणारी हलकी, जड, अवजड वाहनांचा प्रवास बंद ठेवण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग

या रस्ते बंदच्या काळात डोंबिवली, कल्याण भागातील प्रवाशांनी मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून इच्छित स्थळी प्रवास करावा. शिळफाटा मार्गे नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांनी काटई नाका येथे डावे वळण घेऊन बदलापूर पाईपलाईन मार्गे तळोजा रस्त्याने इच्छित स्थळी जावे. बदलापूर, अंबरनाथ, कर्जतकडून येणाऱ्या वाहन चालकांनी काटई नाका येथे न येता खोणी गाव येथे वळण घेऊन तळोजा काँक्रीट रस्त्याने पनवेल, नवी मुंबईकडे जावे. हलक्या, मध्यम वाहनांनी काटई गाव, काटई गाव कमान येथून लोढा पलावा दिशेने विरुध्द मार्गिकेतून जावे. तेथून पलावा जंक्शन येथे नियमित मार्गिकेत येऊन इच्छित स्थळी जावे, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे. जड, अवजड वाहनांना हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागातर्फे (डीएफसीसी) निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पाच दिवसाच्या कालावधीत करण्यात येणार आहे. या कालावधीत पलावा जंक्शनकडे येणारी हलकी, मध्यम वाहनांची वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात येणार आहे. अवजड वाहनांना हा रस्ता बंद असेल. हे काम पूर्ण झाल्यानंतर शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मोठे साहाय्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या कालावधीत सहकार्य करावे. – पंकज शिरसाट, उपायुक्त, वाहतूक विभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shilpata road will remain closed for five days in february for reconstruction work of nilaje railway flyover asj