ठाणे : राज्याच्या राजकीय पटलावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना चांगलाच जोर आला आहे. या युतीमुळे मुंबईच्या राजकारणात समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शिवसेना शिंदे गटाने आपली स्वतंत्र ताकद दाखवत मुंबई महापालिकेसाठी कार्यकारी समिती जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र अशी २१ जणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे.

या समितीच्या माध्यमातून निवडणुकीतील सर्व महत्त्वाचे निर्णय, प्रचार धोरण, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आखले जाणारे उपक्रम राबवले जाणार आहेत. शिवसेनेच्या या कार्यकारी समितीत पक्षाचे प्रमुख नेते, विद्यमान खासदार, माजी खासदार, आमदार आणि माजी आमदारांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजप-शिवसेना युतीकडून मोठा प्रयत्न सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनीही ताकदीनिशी उतरण्याची तयारी केली आहे. अशा स्थितीत ठाकरे गट-मनसे युती होणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत असला तरी शिवसेना शिंदे गटाने मात्र वेळ न दवडता २१ शिलेदारांची फळी उभी करून आपला प्रचारयुद्धाचा पहिला टप्पा सुरू केला आहे. राजकीय वर्तुळात या घडामोडींकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात असून, मुंबई महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

मुंबई महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली नागरी संस्था मानली जाते. तब्बल काही हजार कोटींपेक्षा अधिकचा अर्थसंकल्प असलेल्या या महापालिकेवर सत्ता मिळवणे म्हणजे केवळ मुंबईच्या विकासकामांवर नियंत्रण मिळवणे एवढेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणे मानले जाते. शिवसेनेची पारंपरिक ताकद म्हणून ओळखली जाणारी ही महापालिका शिवसेनेच्या ताब्यात राहिली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत शिंदे गटाच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने शिवसेनेचे नाव, धनुष्यबाण चिन्ह आणि बहुसंख्य आमदार-खासदार आपल्या बाजूला खेचले. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेच्या परंपरागत कार्यकर्त्यांच्या भावनांवर आधार घेत पक्षाची गढी सांभाळण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आता राज ठाकरे यांच्या मनसेसोबत उद्धव ठाकरे युती होण्याची चर्चा रंगली आहे, ज्यामुळे ठाकरे कुटुंबीय पुन्हा एकत्र येऊन शिंदे गटाला आव्हान देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी २१ शिलेदारांची स्वतंत्र कार्यकारी समिती जाहीर करून आपल्या राजकीय पातळीवरील रणनीती स्पष्ट केली आहे.

म्हणजेच ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला प्रतिस्पर्धी म्हणून शिंदे गटाने स्वतःची फळी मजबूत करून दाखवली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक विकासकामांपुरती मर्यादित राहणार नसून ती “खरी शिवसेना कोणाची ?” याच्या अंतिम उत्तराची लढाई ठरणार आहे. भाजप-शिंदे युती एकीकडे, तर ठाकरे-मनसे युती दुसरीकडे, आणि त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका असा सामना या वेळी मुंबईकरांना पाहायला मिळू शकतो.

या २१ सदस्यीय समितीत एकनाथ शिंदे हे प्रमुख नेते म्हणून तर रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, मीनाताई कांबळे यांसारखे ज्येष्ठ नेते अग्रभागी असतील. त्याचबरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा आणि माजी खासदार राहुल शेवाळे, संजय निरुपम यांचा सहभाग समितीला बळ देणार आहे. याशिवाय प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, मुरजी पटेल, दिलीप लांडे, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर आणि मनिषा कायंदे हे विद्यमान आमदार तर सदा सरवणकर, यामिनी जाधव, दीपक सावंत आणि शिशिर शिंदे हे माजी आमदार म्हणून समितीत आहेत.