अंबरनाथ : जानेवारी २०२६ पूर्वी महापालिका, नगरपालिका निवडणुका पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळताच सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेतील संघर्ष स्थानिक पातळीवर वाढत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात पालिकांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. अशा ठिकाणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विविध समस्यांवर बोट ठेवत पालिका प्रशासनाला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

पालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारीप्रणित प्रशासकीय कारभारावर बोट ठेवत निवडणुकीतील प्रचाराचे संकेत दिले जात असल्याची चर्चा रंगली आहे.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. आता या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात निवडणुका होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. स्थानिक पातळीवर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच आता वरिष्ठांनाही याचे स्पष्ट संकेत देण्यात सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्ष तीव्र होतो आहे. त्याचे पडसाद जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही पाहायला मिळत आहेत.

बदलापूर शहरात भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद तीव्र होत असल्याची चर्चा आहे. आमदार कथोरे यांनी थेट पालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा इशाराच अधिकाऱ्यांना दिला आहे. चौकाचौकात पालिकेच्या गैरकारभाराचे पुरावे देणार असे सांगत कथोरे यांनी थेट पालिकेवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेलाच आव्हान दिले आहे. तर शहरातील इतर पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांमध्येही हा संघर्ष तीव्र होतो आहे.

अंबरनाथ शहरातील नागरी समस्यांवरून भाजपने पालिका प्रशासनाला कोंडीत धरण्यास सुरूवात केली आहे. अभिजीत करंजुले यांच्या माध्यमातून पालिका क्षेत्रातील पथदिवे, रस्ते आणि इतर समस्यांवरून पालिकेचा टाळे ठोकण्याचा इशाराच दिला आहे. येथेही पालिकेत शिवसेनेचे वर्चस्व असून अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

शेजारच्या उल्हासनगर शहरातही काही दिवसांपूर्वी भाजपने शहरातील समस्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. येथील स्थानिक आमदार कुमार आयलानी यांनी थेट पालिका आयुक्तांना आंदोलनाचा इशारा दिला होता. येथेही शिवसेनेची सत्ता होती. तर येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा वरचष्मा आहे. कल्याण डोंबिवली शहरातही शहरातील समस्यांवरून भाजपच्या वतीने आवाज उठवला जातो. तर ठाण्यातही नागरी समस्यांवर आक्रमक भूमिका घेतली जाते आहे.

हा संघर्ष येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय राजवटीत सत्ताधारी आमदार आणि ठाणे जिल्ह्यात विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि शिवसेना आमदारांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे भाजपने ही आक्रमक भूमिका कायम ठेवल्यास येत्या काळात पालिकेत सत्ताधारी पक्षांमध्येच संघर्ष पाहायला मिळणार आहे.