ठाणे : “नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो. पण, त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागले. त्यासाठी तुम्ही तयार आहात का”, अशी विचारणा करत वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाणे महापालिका निवडणूकीचे रणशिंग फुंकले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यात यूतीचा आग्रह धरला आणि या युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेल असेही नाईक यावेळी म्हणाले.

भाजपाच्या सेवा पंधरवडानिमित्त वर्तकनगर येथील पक्षाच्या जिल्हा विभागीय कार्यालयात नाईक यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हाध्यक्ष संदिप लेले, माजी नगरसेवक संदिप लेले, नारायण पवार, सुनेश जोशी, मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, स्नेहा आंब्रे, अर्चना मणेरा, नंदा पाटील, प्रतिभा मढवी, दिपा गावंड यांच्यासह माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना नाईक यांनी आक्रमक भूमिका घेत, नवीमुंबईप्रमाणे ठाण्यातही भाजपची सत्ता येऊ शकते असा दावा केला.

“ तुम्हाला यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल, तुम्ही तयार आहात का ”, या त्यांच्या आवाहनाला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला.“ नवी मुंबई महापालिकेवरही अनेकांचा डोळा आहे पण, त्यांना मी उत्तर देणार आहे. वरिष्ठ नेते महायुतीबाबत निर्णय घेतील. पण, युतीत कार्यकर्त्यांचा सन्मान होत नसेल तर मी कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यावेळी पहिला विरोध करणारा मी असेन ”, असे नाईक म्हणाले. रावणाने अंहकार केला, त्याचा नाश झाला, असे सांगत कुणीही अहंकार बाळगू नये, असेही ते म्हणाले. निवडणूक आचारसंहिता लागेपर्यंत माझा ठाण्यातील जनता दरबार सुरुच राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाईक आणि शिंदे संघर्षाला धार ?

एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक या दोन्ही राजकीय नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर बोलण्याची एकही संधी सोडत नाहीत. नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेऊन शिंदेच्या सेनेला डिवचले होते. नवी मुंबई महापालिका निवडणुक प्रारुप प्रभाग रचनेवरून गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रभाग रचनेविरोधात चार हजाराहून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून त्या नाईक समर्थकांनी दाखल केल्याचे समजते. ठाण्याचा प्रभाव असलेल्या प्रभाग रचनेवरून अस्वस्थ असलेल्या नाईक यांनी याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला होता. या प्रकरणामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदे आणि नाईक संघर्ष आणखी वाढला आहे.