ठाणे – जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये आता सुरक्षिततेची दृष्टीने महत्वाची पावले उचलली जाणार आहेत. ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता, उपस्थिती आणि शिस्तीमध्ये सुधारणा होण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी त्यांनी या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या. तर सीसीटीव्ही बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बदलापुरातील एका नामांकित शाळेत लहानग्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात आक्रोश पसरला होता. यानंतर खासगी आणि सरकारी शाळांमधील विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तर बदलापुरातील संबंधित शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा देखील बंद असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले होते. यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार देखील चव्हाटयावर आला होता. यानंतर राज्य बालहक्क संरक्षण समितीने जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये भेट देऊन सर्वेक्षण केले होते. यावेळी जिल्हा शिक्षण विभागाला सर्व खासगी आणि सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यन्वित करण्याचे आदेश दिले होते.
मात्र यानंतर देखील प्रशासनाकडून याबाबत कार्यवाही करण्यात आली नव्हती. यामुळे पालकांकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात येत होती. यानंतर एप्रिल महिन्यात ठाणे महापालिकेने त्यांच्या अखत्यारीतील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची कार्यवाही सुरु केली. याच पार्श्वभूमीवर आता ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या १ हजार ३२८ शाळा आहेत. यामध्ये १० हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या सर्व शाळांतील सर्व वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.