भाईंदर – मिरा भाईंदरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज ठाकरेंच्या जाहीर सभेला मनसे कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य शासनाच्या हिंदी सक्तीविरोधात मनसेने ठोस भूमिका घेतली होती. मनसेच्या या भूमिकेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जाहीरपणे पाठींबा दिला होता. या निर्णयामुळे वातावरण तापत असल्याचे लक्षात येताच शासनाने तो आदेश मागे घेतल्याचे जाहीर केले.
या प्रकरणामुळे मराठी भाषिक नागरिक एकत्र येऊ लागल्याने, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे विजयी मेळावा घेतला होता. त्यानंतर मिरा रोड येथे झालेल्या मराठी भाषिक आंदोलनातही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र दिसून आले होते. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी मनसे आणि ठाकरे गटाची युती जवळपास निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात दोन्ही पक्षांचे नेते जाहीर वक्तव्य करत आहेत.
दरम्यान, मराठी भाषिक नागरिकांनी मोर्चाला उस्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे त्यांच्या आभारासाठी राज ठाकरे १८ जुलै रोजी मिरा भाईंदरमध्ये आले होते. त्यांच्या स्वागतासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरभर जाहिराती लावून, मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग घेतला होता.