Maharashtra Anant Chaturdashi Live Updates, 29 September 2023 : राज्यात सगळीकडेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाले आणि त्यानंतर आज (२८ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मानाचे गणपती विसर्जित होत आहेत. दुसरीकडे राज्यात सगळीकडे पावसाची हजेरी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. गणपती विसर्जनासह राज्यातील प्रत्येक घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…
Mumbai Pune Konkan Maharashtra Ganpati Visarjan 2023 Live Updates : गणपती विसर्जनासह राज्यातील प्रत्येक घडामोडीच्या लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर…
नांदेड शहरात आज गणपती विसर्जनास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शहरात आसना नदी पात्रात भाग्यनगर, विमानतळ भागातील गणपतीचे मंदिर विसर्जन होत आहेत. झरी या ठिकाणी मोठ्या गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे. भाग्यनगर पोलिस स्टेशन हद्दीतील मोठ्या गणपतीचे विसर्जन पुयणी भागातील तलावात करण्यात येणार आहे. गोवर्धन घाट याठिकाणी घरगुती गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात पोलीस बंदोबस्तासाठी विसर्जन ठिकाणी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, पुर्ण पोलीस कर्मचारी, बाहेरुन आलेले एक हजार पोलीस कर्मचारी, क्युआरटी, एस. आर. पी., आर. सी. पी. असा मोठा पोलीस फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला असल्याचे शहर पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी सांगितले.
ठाण्यातील टेंभी नाका येथे असलेल्या जय अंबे मा ट्रस्टच्या नवरात्र उत्सव मंडपाचा भूमीपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. मागील ४७ वर्षांपासून हा नवरात्र उत्सव अविरतपणे ठाणे शहरात मोठ्या दिमाखात पार पडत आहे. यंदाही हा नवरात्र उत्सव धुमधडाक्यात पार पडणार आहे. यंदाचा देखावा आयोध्या नगरीतील राम मंदिराची प्रतिकृती असणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली.
शनिवारी पहाटे आलेल्या पुरामुळे नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने फक्त घरगुती साहित्याचेच नुकसान झाले नाही तर विद्यार्थ्यांची अभ्यासांची पुस्तके, वह्यासुद्धा भिजल्या. धंतोलीतील शासकीय जिल्हा ग्रंथालयातील चार हजारावर पुस्तके पाण्यात भिजली आहेत.
मुंबई व कोंकण पदवीधर तसेच मुंबई व नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात २०२४ मध्ये निवडणुका होत आहे.यासाठी पूर्णपणे नवी मतदारयादी तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य शासनास दिले आहे. सविस्तर वाचा
शेतातील हिरव्या शेंगा सोलून टरफले ताटात टाकली. तेव्हाच महिलेच्या गळ्यातील अंदाजे तीन ते साडेतीन तोळ्याची सोन्याची पोथ ताटात तशीच राहिली. हेच टात म्हशी समोर ठेवले. तीने हिरव्या शेंगा सोबत सोन्याची पोथ फस्त केली. मात्र ही बाब लक्षात येताच घरातील सर्वांची एकच धांदल उडाली. सविस्तर वाचा
गणपती हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असल्याने प्रभात किड्स स्कूलच्या सांस्कृतिक विभागाने यावर्षी ‘सृजनात्मक गणेश पूजन’ या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा केला. बालचित्रकारांनी गणेशाच्या छायाचित्र रेखाटले. सविस्तर वाचा
मोबाईलसारखेच विजेचे मीटर रिचार्ज करण्याची सुविधा आता गोंदियाकरांना लवकरच मिळणार आहे. नागपूर, चंद्रपूरसह गोंदियातही स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. त्याचे कंत्राट मॉन्टेकार्लो कंपनीला देण्यात आले आहे. सविस्तर वाचा
मुस्लीम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज गुरुवारी बुलढाण्यात दिमाखादार जुलूस काढण्यात आला. गणेश विसर्जन, पोलिसांवर पडणारा ताण लक्षात घेऊन मुस्लीम बांधवांनी यंदा वेळेची मर्यादा बाळगून ‘जश्ने ईद मिलादुन्नबी’ साजरा केला.
सविस्तर वाचा
पुणे-अमरावती आणि मुंबई-बल्लारशाह या मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने या मार्गावरून धावणाऱ्यादोन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ देण्यासोबतच या गाड्यांच्या तब्बल ४२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. सविस्तर वाचा
बुलढाणा: गणेश विसर्जन करून परतणाऱ्या वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने एक व्यक्ती गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले. यानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक जाळला. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला.
केंद्र सरकारतर्फे पीएम ई-बससेवा योजनेंतर्गत जळगावात शहर बससेवा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
अमरावती : ई चलान प्रणालीमुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंड करण्याबरोबरच वाहन चोरीचे गुन्हेही उघडकीस आणणे शक्य होत आहे. या प्रणालीत तांत्रिक व्यवस्थेमुळे अमरावती पोलिसांनी चोरीचे वाहने जप्त केले असून ते चोरणाऱ्या आणि वापरणाऱ्यांचीही ओळखही पटवली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी अमृता फडणवीसांसह त्यांची मुलगीही उपस्थित होती.
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करून तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदान केंद्रांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
मिरवणुकीत सहभाग घेत दुचाकीवरून एका चौकातून दुसऱ्या चौकाकडे जाणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
सांगली : दारुच्या नशेत भावानेच भावाचा खून केल्याची घटना नांद्रे (ता.मिरज) येथे बुधवारी रात्री घडली. संशयिताला पोलीसांनी आज पहाटे ताब्यात घेतले आहे. दत्तात्रय कुंभार (वय३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी रात्री भाऊ राहूल कुंभार याच्याशी भांडण झाले. त्यावेळी दोघेही दारुच्या नशेत होते. या भांडणात राहूलने लाकडी दांडके व धारदार हत्याराने दत्तात्रयवर हल्ला केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी प्रकाश कुंभार यांनी सदोष मनुष्यवधाची फिर्याद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून संशयिताला आज पहाटे पोलीसांनी ताब्यात घेतले.
गडचिरोली : शहरातील महिला व बाल रुग्णालयात ‘सिझेरियन’ प्रसूतीनंतर दोन महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जंतुसंसर्गामुळे दोघींचाही मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज असून, मृतकांच्या नातेवाईकांनी उपचारात हयगय झाल्यामुळे दोघींनाही जीव गमवावा लागल्याचा आरोप केला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीत प्रथमच दुपारी चार वाजता सहभागी होणार आहे. त्यामुळे यंदा मिरवणूक लवकर संपेल, अशी अटकळ बांधली जात आहे.
पुणे : पुण्यातील वैभवशाली परंपरा असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होत आहेत. लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत ढोलताशा पथकांचे वादन सुरू आहे. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे.
प्रमुख रस्ते बंद असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील मेट्रोने प्रवास करून येत विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. मिरवणुकीच्या या उत्साही वातावरणामुळे चंद्रकांत पाटील यांनाही राहावले नाही. त्यांनीही उत्साहाने ढोलपथकात सामील होऊन भगवा ध्वज नाचवला, तसेच ढोलवादनही केले.
अकोला मार्गे धावणाऱ्या हैदराबाद-जयपूर व काचीगुडा-बिकानेर या दोन साप्ताहिक विशेष गाड्यांना डिसेंबरअखेर व जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या व्हासरसने केवळ विदर्भातील सोयाबीन पिकावरच नव्हे तर मध्य प्रदेश आणि तेलंगणातील सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला आहे.
रोहित पवार यांच्या पाठोपाठ आता शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील पिंपरी- चिंचवडमधील गणेश मंडळाच्या भेटी घेऊन आरती केली. पिंपरी- चिंचवड शहर अजित पवार यांचा गड मानला जातो आणि याच बालेकिल्ल्यात शरद पवार गटाने ताकद वाढवण्यास सुरुवात केल्याचं चित्र बघायला मिळत आहे.
मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित, गणरायाचा नामघोष करत आनंद साजरा, दर्शनासाठी नागरिकांची गर्दी
गणेशोत्सवपूर्वी इटली येथील अॅना मारा या तरुणीने श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडामध्ये मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेतले होते. तर या तरुणीने आज विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन प्रात्यक्षिक सादर करून पुणेकर नागरिकांची मने जिंकली.
आज अनंत चतुर्दशी निमित्त सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. आज नंदुरबार जिल्ह्यातील २२८ गणेश मंडळ विसर्जन मिरवणूक काढत आहे. नंदुरबार येथील श्री मानाच्या दादा गणपतीची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून या विसर्जन मिरवणुकीत महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.
मानाच्या प्रथम दादा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉ. हिना गावित यादेखील सहभागी झाल्या त्यांनाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनीही विसर्जन मिरवणुकीत नाचण्याचा आनंद घेतला. हिना गावित यांनी मानाचा दादा गणपतीचा रथही ओढला. या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष भक्तांनी सहभाग घेऊन नाचण्याचा आनंद घेतला.
मागील नऊ दिवसांत आपल्या लाडक्या गणरायाची सेवा केल्यानंतर आज गणरायाला निरोप दिला जात आहे. बीडमध्ये १२०० हून अधिक ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. बीड शहरात कंकालेश्वर आणि खंडेश्वरी मंदिर परिसर विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन फुटांपर्यंत असणाऱ्या गणेश मूर्तीचं संकलन नगर परिषदेकडून केले जात आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचाही चोख बंदोबस्त जिल्हाभरात लावण्यात आला आहे. बीड नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांनी गणेश विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विसर्जन मिरवणुकीला येण्यासाठी आज सकाळी मेट्रो सेवेचा वापर केला
यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी ढोलताशा पथकांच्या सरावामुळे होणाऱ्या दणदणाटाची बरीच चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर आता प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत किती दणदणाट होणार असा प्रश्न आहे.
मुंबईत काही पाकिस्तानी मच्छीमार आल्याची माहिती देणारा दूरध्वनी मुंबई पोलिसांना आला आहे.
नागपूर : गावातील एका १५ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर प्रियकरासह सात जणांनी बलात्कार केला. मुलीचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती बनवून मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रूपवर प्रसारित केल्या. तर अन्य पाच आरोपींनी छायाचित्र दाखवून शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केली. याप्रकरणी खापा पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मंडळांना मागील वर्षाचेच क्रमांक; विसर्जन मिरवणूक रेंगाळल्यास कारवाई; पोलिसांचा इशारा (संग्रहित छायाचित्र)