Maharashtra Budget Session, 24 March 2023: राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यातील भाषणानंतर २४ तासांच्या आत पालिका प्रशासनानं माहीमच्या समुद्रातील बांधकाम हटवलं आहे. त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तर दुसरीकडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस आता शिल्लक असून त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mumbai Maharashtra Live News: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!
गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांची ओमानमध्ये तस्करी केली जाते. त्यांचं शोषण केलं जातं, त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जातो. यासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना केंद्राशी बोलावं लागेल – अजित पवार</p>
चेन्नईत ४० लोकांनी या अॅपच्या नादी लागून पैसे गमावले आणि आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात लोकांनी आत्महत्या करेपर्यंत आपण वाट पाहणार आहोत का? – अजित पवारांचा सवाल
फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूबवर लॉटरी अॅपच्या जाहिराती दाखवल्या जातात. त्या बंद केल्या जाव्यात. युवक बक्षिसांच्या लालसेपोटी जुगार खेळायला लागले आहेत. महाराष्ट्रातील नामांकित सिने अभिनेते खोट्या जुगारी अॅपची जाहिरात करतात. महाराष्ट्रात तरी अशा अॅपवर बंदी असली पाहिजे. याची जाहिरात करणाऱ्या लोकांवरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत – अजित पवार
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलीस बंदोबस्त दिला जातो. मंत्र्यांना बंदोबस्त असतोच, पण आमदारांनाही बंदोबस्त दिला गेला. पण राज्यात पोलिसांची संंख्या कमी आहे. अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. बंदोबस्तासाठीच्या पोलिसांपैकी आजच्या घडीला सगळ्यांना किती बंदोबस्त आहे, याविषयी उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं – अजित पवार
कुणीतरी बाहेरून येतात आणि धडाधड गोळ्या घालतात, अशा अनेक घटना घडत आहेत. खुद्द शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यातही हे प्रकार घडत आहेत – अजित पवार
मी पहिल्यांदा अधिवेशनात बघतोय की २९३ चे तीन प्रस्ताव आहेत, पण त्याला अजून उत्तर मिळालेलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे विधिमंडळाच्या इतिहासात त्या त्या आठवड्यातल्या प्रस्तावाला त्याच आठवड्यात उत्तर दिलं जात होतं. यात दोष कुणाचा आहे ते तुम्ही ठरवा – अजित पवार
नाशिक बदलत्या हवामानाचा फटका नागरीकांना बसत असून आरोग्य विषयक तक्रारींमध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत करोना सदृश्य रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी एकाच दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत १८ ने वाढ झाली असून त्यापैकी ११ रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत.
जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा येथील शेतकर्याच्या हिश्श्याची शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील तलाठ्यासह कोतवालास गुरुवारी सापळा रचत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
कल्याण डोंबिवली पालिकेेचे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी पालिका अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नागरी सुविधा कामांसाठी निधी देताना हात आखडता घेतला आहे. तेच आयुक्त कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याच्या विषयावर पोटतिडकीने बोलत असल्याने शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकच्या कोलार येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे ? असा प्रश्न त्यांनी विचारला होता.या विरोधात गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी न्यायालयाने राहुल गांधी दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.त्या निर्णयानंतर काल देशभरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.
व्यायामशाळेत जाणारे युवक पिळदार शरीरयष्टीसाठी प्रतिबंधित असलेले अँनाबॉलिक स्टेरॉइडचे सेवन करीत आहेत. शहरातील अनेक दुकानांमध्ये हे स्टेरॉइड व बनावट प्रोटीनची सर्रास विक्री होत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अधिसभा नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळे लढल्याने मतविभाजनाचा जबर फटका महाविकास आघाडी आणि समविचारी इतर संघटनांना बसला आहे.
प्रयोगशील कष्टाळू शेतकरी व शेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती पुंडलिक पारस्कर यांनी गुरुवारी पहूरजीरा (तालुका शेगाव) येथील शेतात आत्महत्या केली. यामुळे शेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील हिंदी विभागातील मानसिक छळाचे आणि डॉ. धवनकर प्रकरण ताजे असतानाच आता विद्यापीठाशी संलग्नित नंदनवन येथील स्व. वसंतराव नाईक शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील प्राध्यापकावर १९ वर्षीय विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.
आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय चित्रपटातून मांडले पाहिजे. या माध्यमातून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे. तर आणि तरच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. चित्रपट ग्रामीण आहे की शहरी हा मुद्दा तेव्हा बाजूला राहतो, असे मत प्रसिध्द लेखक दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी पिंपरी- चिंचवड च्या सांगवीत बोलताना व्यक्त केले.
ठाण्यातील बाळकूम भागात सासऱ्याच्या जाचाला कंटाळून रेखा सुर्यवंशी (२२) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेखा हिच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तिच्या सासऱ्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्धा जिल्ह्यात सतत चर्चित दारूबंदीचा विषय आज विधानसभेत आमदार डॉ.पंकज भोयर यांनी उपस्थित केला.अधिवेशन सुरू होताच त्यांनी अवैध दरुविक्रेत्यांची साखळी कशी तोडणार,पोलीस दारूबंदीची जबाबदारी उत्पादन शुल्क खात्यावर टाकत असल्याने त्या खात्यास अतिरिक्त मनुष्यबळ देणार का व ही बंदी नफ्याची की तोट्याची हे कसे ठरविणार असे प्रश्न आ.भोयर यांनी उपस्थित केले.
संत्री फळबागांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहणीत निदर्शनात आले आहे. या किडीमुळे फळांवर विकृती येत असून रोग देखील वाढत आहे. त्याचा परिणाम फळांच्या दर्जावर होतो.
सांगली: पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीची प्रतिक्षा बागडी आणि कोल्हापुरची वैष्णवी पाटील यांच्यात लढत होत आहे. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये या स्पर्धा सुरु आहेत. शुक्रवारी झालेल्या उपांत्य स्पर्धेत प्रतिक्षा बागडी व वैष्णवी पाटील या दोघींनी प्रतिस्पर्धींना पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पुणे: एकीकडे महागाईबाबत चर्चा होत असताना दुसरीकडे राज्यातील मालमत्ता खरेदी-विक्री जोरात सुरू असल्याचे समोर आले आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्यभरातून २४ लाख १४ हजार ९६३ दस्त नोंदविण्यात आले असून तब्बल ३८ हजार ५९७.४४ कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणतात, “नरेंद्र मोदींना २३ कोटी मतदारांनी निवडून दिलंय. कुणाच्या औकातीत नाही हे. कुणाच्या भीकेवर…!”
पुणे: करोनामुळे राज्यात रखडलेल्या जमिनींच्या मोजण्या वेगाने करण्यासाठी मनुष्यबळ भरती करण्यात आले आहे. याबरोबरच आता भूमी अभिलेख विभागाला ३०० अत्याधुनिक रोव्हर यंत्र प्राप्त झाली आहेत. त्यामुळे राज्यातील प्रलंबित जमिनींच्या लाखो मोजण्या मार्गी लागणार आहेत.
ब्रिटनची मध्यवर्ती बँक असेलल्या बँक ऑफ इंग्लडने महागाई विरोधात आक्रमक पाऊल टाकत व्याजदरात २५ आधार बिंदूंची वाढ केली आहे. जागतिक पातळीवर वित्तीय व्यवस्थेतील अडचणींमुळे संभवणाऱ्या आर्थिक परिणामांबद्दल चिंता व्यक्त करतानाच, तिने गुरुवारी सलग ११ वी व्याजदर वाढीची घोषणा करत महागाईशी लढण्यावर लक्ष केंद्रित केले.
रात्रभर प्लॅनिंग करायचं, सकाळी ९ वाजता उठून मीडियासमोर यायचं आणि काहीतरी बोलायचं असं त्यांचं चाललं आहे. बाळासाहेबांच्या नंतर यांच्या कुणाच्यात हिंमत नव्हती. ती हिंमत आता आपल्या सरकारने दाखवली आहे. संजय राऊतांचं काय घेऊन बसलात? ते कुणीही नाहीत. ते फक्त बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहेत – भरत गोगावले
दोन्ही बाजूनं आचारसंहिता पाळली गेली पाहिजे. मी स्वत: आमच्या सदस्यांना हे सांगितलं की काल विधानभवन परिसरात जे झालं (राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारणं) ते चुकलंय. असं नाही केलं पाहिजे. पण त्यासोबतच मुख्यंमत्री-उपमुख्यमंत्र्यांविरोधात होणारी घोषणाबाजीही चुकीची आहे – देवेंद्र फडणवीस
तुमचे नेते आमच्या पंतप्रधानांचा अपमान करत असतील, तर आम्ही ते खपवून घेणार नाही. तुम्ही वारंवार देशाचा, पंतप्रधानांचा, सावरकरांचा अपमान करत असाल, तर कोण खपवून घेणार? सगळ्यांनीच बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे – एकनाथ शिंदे
सभागृहाच्या भावनांची कदर करत निर्णय घेतला जाईल. निर्देश दिल्यानंतरही अशी निमंत्रण पत्रिका का छापण्यात आली, याची चौकशी केली जाईल. महाराष्ट्र शासन याची दखल नक्की घेईल – उदय सामंत
गेट वे ऑफ इंडियाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण होणार आहे. पण दुर्दैवाने विधानपरिषदेचा कार्यक्रम पत्रिकेत उल्लेखही नाही. निमंत्रण पत्रिकेत सभापती नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाही. त्याचा तीव्र शब्दांत निषेध आहे – भाई जगताप
काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची हानी एका विशिष्ट समाजाच्या मतांसाठी त्यांनी जे काही केलं, त्यामुळे झाली. काँग्रेससारखा राष्ट्रव्यापी पक्ष अनेक ठिकाणी पराभूत झाला. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी लढा दिलेला, ते उद्धव ठाकरे संपूर्णपणे विसरले आहेत. कुणाच्या पाठी किती धावायचं, याच्या मर्यादाही त्यांनी सोडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीही बोलण्याची माझी तयारी नाही – दीपक केसरकर
देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. २३ कोटी मतदारांनी निवडून दिलंय. कुणाच्या औकातीत नाही हे. कुणाच्या भीकेवर ते पंतप्रधान झालेले नाहीत. पळपुट्या माणसाच्या पक्षानं मोदींना चोर म्हणणं सहन करणार नाही. ती तर बाहेरची भूमिका होती. पण सभागृहात मोदींना चोर म्हटलं गेलं आहे – सुधीर मुनगंटीवार.
महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Mumbai Maharashtra Live News: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!