नांदेड : महाराष्ट्र राज्यात बिनशर्त सामील झालेल्या मराठवाडा विभागाला राज्य स्थापनेच्या १५ व्या वर्षात पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद मिळाले. त्यास यंदा ५० वर्षे पूर्ण झाली; पण मराठवाड्यातील काँग्रेस पक्ष आणि नेत्यांना या महत्त्वाच्या औचित्याचा विसर पडला आहे.
१९७५ साल उजाडण्यापूर्वी मराठवाड्यामध्ये विकास आंदोलन उभे राहिले होते. सत्तरच्या दशकात राजकारण आणि समाजकारणात उतरलेल्या कार्यकर्त्यांमधून मराठवाड्यासाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी सर्वप्रथम झाली. मग वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यासाठी प्रयत्न झाले, काही प्रमाणात संघर्ष झाला. त्यानंतर वरील ऐतिहासिक वर्षांत तेव्हा नांदेड जिल्ह्याच्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शंकरराव भाऊराव चव्हाण २० फेब्रुवारी १९७५ रोजी मुख्यमंत्री झाले.
या घटनेस आठ महिन्यांपूर्वी ५० वर्षे पूर्ण झाली. याच वर्षात शंकररावांच्या कर्मभूमीत काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला असून नवख्या आणि हौशी कार्यकर्त्यांकडे पक्षाची सूत्रे गेल्यामुळे आपल्या पक्षाच्या दिवंगत नेत्याच्या पहिल्या मुख्यमंत्रिपदाची पन्नाशी पूर्ण झाल्याची नोंद कोणाकडेही नसल्याचे दिसून आले. फेब्रुवारी महिन्यात शंकररावांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्याची औपचारिकता स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पार पाडली; पण तेव्हा वरील औचित्याचा कोणीही उल्लेख केला नाही.
राज्याचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी शंकरराव १९५६ पासून आधी द्विभाषिक मुंबई राज्य आणि नंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करत होते. शिस्तप्रिय नेते आणि कुशल प्रशासक अशी त्यांची ख्याती झाली होती. ते राज्याचे चौथे मुख्यमंत्री होते. या पदाच्या पायावरच त्यांनी नंतर १९८० ते १९९६ दरम्यान केंद्र सरकारमध्ये शिक्षण, गृह, संरक्षण आणि वित्त इत्यादी खात्यांची मंत्रिपदे भूषविली.
आणीबाणीनंतर पक्षांतर्गत उठावानंतर शंकररावांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी पक्षातील एका गटाने त्यांचा मानभंग केल्यानंतर शंकररावांनी १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र पक्षाचा (मसकाँ) प्रयोग केला. या निवडणुकीत या पक्षातर्फे त्यांच्यासह मधुकरराव घाटे विजयी झाले. नंतर १९८० साली नांदेडहून काँग्रेस खासदार होण्यापूर्वी शंकररावांनी आपला औटघटकेचा पक्ष इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन केल्यामुळे ते ‘गोदातीरा’वरून ‘यमुनातीरी’ स्थिरावले. १९८० नंतर ते शेवटपर्यंत काँग्रेस पक्ष व गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले.
शंकररावांच्या पश्चात काँग्रेस नेतृत्वाने त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांना राज्याच्या सत्तेत वाव देत २००८ ते २०१० दरम्यान त्यांना राज्याचे मुख्यमंत्री केले; पण मागील वर्षी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस व या पक्षाची आमदारकी सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. आता ते या पक्षाचे जिल्ह्यातील भाजपाचे नेतृत्व करत असून वडिलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पन्नासाव्या वर्षांत काँग्रेस पक्षाला नेस्तनाबूत करण्यासाठी सज्ज होत असले, तरी ५० व्या वर्षाच्या औचित्याची चव्हाण कुटुंबानेही आतापर्यंत नोंद घेतलेली नाही, असे दिसून आले.
चव्हाण परिवाराशी संबंधित भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यावर अलीकडे झालेल्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर शंकररावांच्या प्रतिमेस अभिवादन केले गेले; पण कारखान्याच्या अध्यक्षांसह कोणीही शंकररावांच्या मुख्यमंत्रिपदास ५० वर्षे झाल्याचा उल्लेख केला नाही.
‘वाय.बी. आणि एस.बी.’
काँग्रेसच्या राजवटीत १९८० च्या दशकात यशवंतराव उर्फ वाय.बी.चव्हाण यांचा राजकीय ‘अस्त’ सुरू असताना शंकरराव उर्फ एस.बी.चव्हाण यांचा दिल्लीमध्ये ‘उदय’ झाला. महाराष्ट्राच्या या दोन्ही नेत्यांनी केंद्रामध्ये गृह, संरक्षण आणि वित्त ही महत्त्वाची खाती सांभाळली. या दोन्ही नेत्यांच्या नावाने महाराष्ट्रात प्रतिष्ठाने आहेत. त्यांतील यशवंतरावांच्या नावाने प्रतिष्ठान उपक्रमशील आहे; पण शंकररावांच्या नावाचे प्रतिष्ठान निष्क्रिय असल्याचे दिसते.
