अलिबाग : सावंतवाडी- कोकणातील २८ नगरपालिकांसाठी निवडणूक होत असून, या निवडणूकीच्या निमित्ताने सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे चित्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला रोखण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट शहर विकास आघाडीच्या नावाखाली एकत्र आले आहेत. तर रायगड जिल्ह्यात कर्जत खोपोली नगरपालिकांच्या निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि शेकापशी हातमिळवणी केली आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या नावाखाली हे पक्ष एकत्र आले आहेत.

तुझे माझे जमेना सत्ता असूनही मन रमेना अशी गत महाविकास आघाडीतील घटक पक्षांची कोकणात झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक नगरपालिकांमध्ये सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांमध्येच चढाओढ पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सोयीस्कर युती आघाडी करण्याचे धोरण सर्वच राजकीय पक्षांनी घेतल आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली नगरपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने भाजपला रोखण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आहेत. कणकवली शहर विकास आघाडी असे या आघाडीला नाव देण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख असलेल्या संदेश पारकर यांनी कणकवलीच्या नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना (शिंदे गट) चे माजी आमदार राजन तेली, शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे उपस्थित होते. या निवडणुकीच्या निमित्ताने राणे विरुध्द शिवसेना शिंदे गट असा संघर्ष पहायला मिळणार आहे.

दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कर्जत आणि खोपोली नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने, शिवसेना ठाकरे गटाशी हात मिळवणी केली आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या नावाखाली हे पक्ष एकत्र आले आहेत. शेतकरी कामगार पक्षानेही परिवर्तन विकास आघाडीत पाठबळ दिले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही नगर पालिका निवडणूकीत भाजप, शिवसेना युतीला राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या आघाडीचे आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणूकी पाठोपाठ नगर पालिका निवडणूकीतही या निमित्ताने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा संघर्ष पहायला मिळाणार आहे.