रत्नागिरी – कोकणातील बंदर विकासाबरोबर कोकण आर्थिक विकासाचे हब कसे होईल. जयगड बंदराचा विकास हाती घेण्यात येणार आहे. मासे, काजू व आंबा यांच्या उत्पन्नातून कोकणचा आर्थिक विकास साधला जाणार आहे, असे मत मत्स्य आणि बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

मंत्री राणे हे रत्नागिरीच्या दौ-यावर असताना रत्नागिरीतील जयगड बंदराचा विकास करण्याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोकणच्या अर्थकारणाच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची असल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले, बंदर विकास होण्यासाठी काय करता येईल? काजु, आंबा आणि मासे याच्या आर्थिक उत्पन्नावर कोकण आर्थिक हब कसे होईल? यासाठी हा दौरा आणि बैठक आयोजित करण्यात आली होती. तसेच कोकणातील वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्ग कोकणसाठी महत्वाचा ठरणार आहे. हा रेल्वे मार्ग लवकरच होण्यासाठी खासदार नारायण राणे सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे ही मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.

कोकणला जलवाहतूकीने जोडण्यासाठी देखील राज्य शासनाच्या मत्स्य विभागाकडून डीपिआर तयार केला जात आहे. ते ही काम लवकरच पुर्ण होईल असे आश्वासन राणे यांनी दिले.

राज्यातील शिवसेना ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यातील युती बाबत सुरु असलेल्या चर्चा विषयी पत्रकारांनी राणे यांनी विचारले असता, ते म्हणाले, कुणी कुणाबरोबर जावे हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मात्र उद्धव ठाकरे बेभरवंशी माणूस असल्याची टीका यावेळी मंत्री राणे यांनी केली. मातोश्रीवर भेटण्यासाठी गेलेल्या त्या काँग्रेसवाल्यांना उद्धव ठाकरे यांनी हाकलून लावले होते. त्यामुळे मनसेचा उमेदवार काँग्रेसला चालणार का? असा प्रश्न ही राणे यांनी उपस्थित केला. आमचा देश हिंदुराष्ट्र म्हणून ओळखले जात आहे. जे कुणी औरंगाचे आहेत, त्यांना परत पाठवले जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितले

हैदराबाद गॅझेट आव्हानाविषयी बोलताना मंत्री नीतेश राणे म्हणाले की, देशात लोकशाही आहे. कुणालाहि कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. तसेच सद्या रत्नागिरीत मफलर वाले फिरत आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील लोकांनी देखील भगवे मफलर वापरावे, असा टोला राणे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना लगावला.

वाटद खंडाळा औद्योगिक वसाहत वरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना मंत्री राणे म्हणाले की, कोकणात रोजगार आला पाहिजे. रिफायनरी आणि वाटद औद्योगिक वसाहत झाली पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यात कुणीही प्रकल्प आणला तरी त्याचे स्वागत केले पाहिजे, असे ही राणे यांनी सांगितले. तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण शासन देणार आल्याचे राणे यांनी शेवटी स्पष्ट केले.