मुंबई – मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात चढलेल्या एका मद्यपीने महिलांसमोर अश्लील वर्तन केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. या डब्यातून प्रवास करणाऱ्या एका माध्यमकर्मी तरूणीने त्याची चित्रफीत तयार केली. ही चित्रफित‘एक्स’ या समाजमाध्यवार प्रसारीत करून रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात (सीएसएमटी) जाणाऱ्या धीम्या लोकल ट्रेनमध्ये चुनाभट्टी स्थानकात एक अनोळखी मद्यपी इसम चढला. तो ट्रेनमध्येच अश्लील कृत्य करू लागला. त्याला काही महिलांनी हटकले. याच डब्यातून प्रवास करणाऱ्या एका माध्यमकर्मीने त्याचे कृत्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. त्याला काही महिलांनी नंतर उतरण्यास सांगितले. मात्र त्याचे वर्तन अतिशय विचित्र होते. महिलांनी विरोध केल्यानंतर तो गुरू तेग बहादूर स्थानकात उतरला आणि आणि नंतर दुसऱ्या डब्यात चढला.

या प्रकरणी रेल्वेच्या मदत क्रमांकावर संपर्क केला असता काही प्रतिसाद मिळाला नसल्याचे महिला प्रवाशांनी सांगितले. शनिवार सायंकाळपर्यंत याप्रकरणात पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नव्हती. दिवसाढवळ्या महिलांच्या डब्यात मद्यपींचा वावर आणि अश्लील कृत्य होत असल्याने महिला प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.