मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक गावे पूरग्रस्त झाली आहेत. त्यात सर्वाधिक फटका बळीराजाला बसला असून त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मदतीचा हात पुढे केला आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने नुकतेच जाहीर केले आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अनोतान नुकसान झाले आहे. शेतातील पिकांसह माती आणि जनावरेही वाहून गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. दरम्यान, राज्य शासनाकडून मदत जाहीर असली तरीही शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शेकडो हात पुढे सरसावले आहेत. अभिनेता प्रवीण तरडेने व टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना सर्वांनीच मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले आहे.
यातच लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ देखील पुढे सरसावले असून त्यांनी तब्बल ५० लाख रुपये आर्थिक निधी देण्याचे घोषित केले आहे. याबाबत त्यांनी समाजमाध्यमावरून माहिती दिली आहे. या मंडळाने २०२१मध्येही महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांसाठी मदत पुरवली. देशावर आपत्ती आल्यास मंडळातर्फे शक्य तशी मदत केली जाते. त्यामुळे यावेळीही मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदतीचा हात दिला आहे.
अन्य सामाजिक उपक्रमातही अग्रेसर
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येतात. तसेच, नवसपूर्तीनंतर अनेक मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात. अनेकजण सढळ हाताने देणग्याही देतात. मंडळाकडे जमा होणाऱ्या निधीचा उपयोग विविध सामाजिक उपक्रमांसाठी होतो. मंडळातर्फे वेळोवेळी आरोग्य शिबिरे, नेत्र शिबिरे, रक्तदान शिबिरे राबविली जातात. तसेच, शिक्षण-उपक्रमात योगदान देते.
विविध घटकांकडून मदतीचा हात! जोगवा, पगार आदींमधून शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने २,२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीमधून अतिरिक्त मदतीची तरतूद केली जात आहे. त्याचबरोबर समाजातील अन्य विविध घटकही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. पारलिंगी समुदायाने चक्क जोगवा मागून शेतकऱ्यांसाठी निधी उभारला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव तसेच शिक्षण आयुक्त यांनी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सर्व शिक्षक संघटनांनी जाहीर केल्यानुसार शिक्षकांचा १ दिवसाचा पगार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विद्यमान आमदार आणि खासदार यांनी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार या मदतीसाठी देणार आहेत. तसेच, अन्य विविध सामाजिक संस्थांकडूनही शक्य तशी मदत पूरग्रस्तांना केली जात आहे.