मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मढ आणि वर्सोवा या दोन समुद्र किनाऱ्यांना जोडणारा मढ – वर्सोवा पूल मुंबई महापालिकेतर्फे उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला असून पर्यावरण मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. मढ – वर्सोवा पूल बांधून पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून अवघ्या पाच मिनिटांवर येणार आहे. तसेच अंतरही २२ किमीवरून अवघ्या दीड किमीवर येणार आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रचंड वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मढ – वर्सोवा हे दोन समुद्र किनारे पूल मार्गाने जोडले जाणार आहेत. मुंबई महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे २१०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून या प्रकल्पासाठी आधीच किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाला आता केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून केंद्र सरकारकडे या प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजरीसाठी शिफारस केली आहे. विविध परवानग्यांअभावी या प्रकल्पाचे काम रखडले होते. मात्र उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक परवान्यांकरीता पाठपुरावा केला असून त्यानुसार राज्य सरकारने आता केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे.

पूल १९६७ पासून रखडला

१९६७ च्या मुंबई विकास आराखड्यात प्रथम प्रस्तावित करण्यात आलेला मढ-वर्सोवा पूल प्रकल्प अखेर पूर्ण होऊ शकणार आहे. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक छाननी व क्षेत्र भेटीनंतर, महापालिकेच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी देऊन केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. या प्रस्तावाचा भाग म्हणून, २.७५१५ हेक्टर जागेच्या बदल्यात ३ हेक्टर पर्यायी जागा निवडण्यात आली असून एका झाडाच्या बदल्यात तीन झाडांचे रोपण केले जाणार आहे, असे पीयूष गोयल म्हणाले.

पूल अतिशय महत्त्वाचा

मढ-वर्सोवा हा महत्त्वाचा पूल प्रकल्प नागरिक, मच्छिमार, अत्यावश्यक वस्तू व सेवा, भारत सरकारचे नौदल व कोस्ट गार्ड आदींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुलामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून दळणवळणाची सुविधा निर्माण होणार आहे. मढ किल्ला व समुद्रकिनाऱ्यासारखी ऐतिहासिक स्थळे या भागात असल्यामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे. तसेच स्थानिक व्यवसायांना लाभ मिळेल व रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

प्रकल्पामुळे हे फायदे

  • १) प्रवासाचा वेळ कमी होणार
  • २) प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून फक्त ५ मिनिटांवर येणार.
  • ३) अंतर २२ किमीवरून १.५ किमीवर येणार
  • ४) थेट रस्ता जोडणीमुळे लांब वळसा घालावा लागणार नाही, तसेच बोटीच्या प्रवासाची गरज नाही.
  • ५) हजारो दररोजच्या प्रवाशांना, स्थानिक मच्छीमारांना, पर्यटकांना लाभ.
  • ६) वस्तू व सेवांच्या वाहतुकीला गती मिळणार
  • ७) पावसाळ्यात बंद होणाऱ्या बोटींना पर्याय मिळून, रहिवासी, पर्यटक, मच्छीमार इत्यादींसाठी अखंड प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.