मुंबई : यंदा अपेक्षित वेळेत महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मोसमी पाऊस परतला आहे. मोसमी पावसाने गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी देशातून पूर्णपणे माघार घेतली आहे. यंदा दरवर्षीपेक्षा लवकर म्हणजेच २४ मे रोजी केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला होता.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस लवकर १४ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानमधून सुरू झाला. गुजरात, राजस्थानच्या बहुतांश भागासह लेह, लडाख, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा या भागातून २ ऑक्टोबरपर्यंत मोसमी पाऊस माघारी फिरला होता.

त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी मुंबईसह उत्तर कोकण, अहिल्यानगर, नाशिकसह उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरपासून बुलढाणा, अकोलापर्यंतचा पश्चिम विदर्भातून मोसमी पावसाने माघार घेतली.

यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा नऊ दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला. केरळमध्ये १ जून रोजी दाखल होणारा पाऊस यंदा २४ मे रोजी दाखल झाला. त्यानंतर २५ मे रोजी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला. त्यानंतर मुंबईसह, पुणे आणि इतर काही भागात पावसाने २६ मेपासून धडक दिली आणि १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. यंदा केरळमध्ये वेळेआधीच मोसमी पाऊस दाखल झाला. सामान्यतः मुंबईत १० जूननंतर पावसाळा सुरू होतो. यंदा मोसमी पाऊस सर्वसाधारण तारखेच्या ९ दिवस आधी निकोबारमध्ये, ८ दिवस आधी केरळमध्ये आणि १३ दिवस आधी महाराष्ट्रात दाखल झाला.

दरम्यान, राजस्थानमधून सरासरी १७ सप्टेंबर रोजी मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा मात्र दोन दिवस लवकर १४ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू झाला. राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून मोसमी पाऊस माघारी फिरला होता. त्यानंतर मोसमी पावसाचा परतीचा प्रवास रेंगाळला. काही भागांतून २ ऑक्टोबरला पुन्हा मोसमी पाऊस माघारी फिरला. राज्यातून सरासरी ५ ऑक्टोबरपासून पावसाच्या परतीची प्रक्रिया सुरू होते आणि १० ऑक्टोबरपर्यंत राज्यातून मोसमी वारे पूर्णपणे माघारी जातात. यंदा नियोजित वेळेपेक्षा पाच दिवस उशिरा मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाला.

परतीचा प्रवास (कंसात नियोजित वेळ)

२३ सप्टेंबर – दक्षिण राज्यस्थान, कच्छमधून परतीचा प्रवास सुरू (१७ सप्टेंबर)

५ ऑक्टोबर – महाराष्ट्रातून (नंदूरबार) परतीचा प्रवास सुरू (५ ऑक्टोबर)

१५ ऑक्टोबर – संपूर्ण देशातून माघार (१५ ऑक्टोबर)

मुंबईत यंदा मोसमी पावसाचा अधिक मुक्काम

सर्वसाधारणपणे मुंबईतील मोसमी पाऊस ३० सप्टेंबरपर्यंत असतो. परंतु या वर्षी काही दिवस वगळता जून , जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुंबईकरांना पावसाने झोडपले. मुंबईत मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास साधारणपणे ८ ऑक्टोबरपासून सुरू होतो. यंदा मुंबईतील मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास दोन दिवस उशीरा सुरू झाला आहे. मागील काही वर्षे पावसाच्या वेळापत्रकात सातत्याने बदल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत २०२३ मध्ये मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास वेळेपूर्वी म्हणजेच ६ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला होता.

२०२२ मध्ये २३ ऑक्टोबरला, तर,२०२१ मध्ये १४ ऑक्टोबरला मोसमी वारे परतले. हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या नोंदीनुसार २०२० मध्ये सर्वात उशीरा म्हणजे २८ ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. मुंबईत आतापर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सरासरी २८३८.४ मिमी पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रात ३५२२.२ मिमि इतका पाऊस झाला.

मुंबईसह ठाणे नवी मुंबईत विजांसह पाऊस

मुंबई तसेच ठाणे आणि नवी मुंबईत गुरुवारी सायंकाळी विजांसह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. काही ठिकाणी जोरदार वारे वाहत होते. सीएसएमटी, दादर, परळ, भायखळा, बोरिवली , अंधेरी, पवई या भागात सरी बरसल्या. दरम्यान,आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप क्षेत्रावरील वरच्या हवेचे चक्राकार अभिसरण त्याच प्रदेशात कायम आहे, जे समुद्रसपाटीपासून सरासरी ५.८ किमी पर्यंत पसरलेले असून, दक्षिणेकडे झुकलेले आहे. याचबरोबर दक्षिण द्वीपकल्पीय भारत आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर ईशान्येकडून वारे वाहत आहेत.

परिणामी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत गुरुवारी तापमानाचा पाराही चढाच होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ३५.८ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रावरील तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी अधिक नोंदले गेले. याचबरोबर ठाणे येथेही ३५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात गुरुवारी सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली. तेथे ३६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले.