मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकीसाठी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आरक्षण निघणार असल्याची चर्चा असली तरी अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने नुकतीच अधिसूचना जाहीर केल्यामुळे याबाबतचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटातील १५ माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित होणार आहेत तर भाजपच्या केवळ दोन माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित होत आहेत. भाजपचे हे दोन्ही माजी नगरसेवक आधीच आरक्षित प्रभागातून आलेले आहेत. त्यामुळे या दोघांनाही फटका बसणार नाही. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचाही प्रभाग आरक्षित झाला आहे.

मुंबई महापालिका निवडणूकांचे पडघम वाजू लागले असून प्रभागांच्या सीमा अंतिम झाल्यानंतर आता आरक्षणाकडे सगळ्या उमेदवारांचे व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. आरक्षणाची सोडत ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निघण्याची शक्यता आहे. मात्र अनुसूचित जाती व जमातींचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारे निघणार असल्यामुळे कोणते प्रभाग आरक्षित होतील याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यातच राज्य सरकारने अधिसूचना काढून मुंबई महापालिकेसाठी अनूसूचित जाती व जमातींचे आरक्षण काढण्यासाठीची नियमावली जाहीर केली आहे.

मुंबई महानगरपालिका प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरवण्याची पद्धत -नियम २०२५ या नावाने ही अधिसूचना काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार यंदाच्या निवडणूकीसाठी चक्रानुक्रमे पद्धतीकरीता प्रथम निवडणूक ग्राह्य धरण्यात आली आहे. म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ज्या प्रभागात आहे ते प्रभाग आरक्षित होणार आहेत.

शिवसेनेच्या दोन्ही गटांना फटका

या नियमानुसार मुंबईतील कोणते प्रभाग आरक्षित होतील ते आता स्पष्ट झाले आहे. मुंबईत अनुसूचित जातींसाठी १५ तर अनुसूचित जमातींसाठी २ जागा राखीव असतील. या १७ जागांपैकी पंधरा जागांवर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे माजी नगरसेवक आहेत तर केवळ दोन जागा अशा आहेत जिथे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे आठ, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे पाच कॉंग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांपैकी गंगा माने यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यापूर्वी मुंबईत चक्रानुक्रमे आरक्षण निघत होते. त्यामुळे २००७, २०१२, २०१७ मध्ये उतरत्या क्रमानुसार आरक्षण देण्यात आले होते. म्हणजे २००७ मध्ये जे प्रभाग आरक्षित होते ते वगळून पुढच्या प्रभागांमध्ये आरक्षण देण्यात आले होते. परंतु, यावेळी नव्याने आरक्षण निघण्याची शक्यता भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केली होती. राज्य सरकारच्या अधिसूचनेमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
या नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित

प्रभाग क्रमांकमाजी नगरसेवकविभाग
९३रोहिणी कांबळे (ठाकरे)वांद्रे पूर्व
११८उपेंद्र सावंत (शिंदे)विक्रोळी पूर्व
१३३परमेश्वर कदम (शिंदे)घाटकोपर पूर्व
१४०नादिया शेख (कॉंग्रेस)गोवंडी
१४१विठ्ठल लोकरे (ठाकरे) देवनार
१४६ समृद्धी काते (शिंदे)चेंबूर
१४७ अंजली नाईक (शिंदे)चेंबूर
१५१ राजेश फुलवारिया (भाजप)चेंबूर
१५२आशा मराठे (भाजप)चेंबूर
१५५ श्रीकांत शेट्ये (ठाकरे)चेंबूर
१८३ गंगा माने (कॉंग्रेस आता शिंदे गटात)धारावी
१८६ वसंत नकाशे (ठाकरे )धारावी
१८९ हर्षला मोरे (ठाकरे) माटुंगा
१९९ किशोरी पेडणेकर (ठाकरे) वरळी
२१५ अरुंधती दुधवडकर (ठाकरे)ताडदेव
५३रेखा रामवंशी (ठाकरे)गोरेगाव
५९प्रतिमा खोपडे (शिंदे)गोरेगाव

पक्षप्रमुख योग्य निर्णय घेतील -किशोरी पेडणेकर

माझा प्रभाग आरक्षित झाला तरी काही हरकत नाही. महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे वरळीत कुठेतरी मला उमेदवारी मिळू शकेल असा मला विश्वास आहे. पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील. यापूर्वीही माझा प्रभाग आरक्षित झाला होता. तेव्हाही मी महिला आरक्षित प्रभागातूनच निवडून आले होते.