मुंबई : महाराष्ट्राच्या साहित्य, सांस्कृतिक, नाटय़ क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा निर्माण करणारी ८५ वर्षांच्या गिरगावातील ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या निवडणुकीचा आखाडा झाला असून ‘ऊर्जा पॅनेल’ने ४०० मतांची चोरी केली आहे, असा आरोप ‘भालेराव विचार मंच’ पॅनेलने मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

३ सप्टेंबर रोजी टपाली मतदानाचा अखेरचा दिवस होता. मात्र अनेक मतदारांपर्यंत मतपत्रिका पोचल्या नसल्याने मतदानाची १७ सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. कुरिअर मार्फत मतपत्रिका पाठवण्यात आल्याचे जाहीर केले. मात्र पत्रिका न पाठवता कुरिअर कंपनीने संस्थेकडे केवळ पावत्या जमा केल्या. संस्थेचा १५ वर्षे कारभार पाहात असलेल्या विद्यमान ऊर्जा पॅनेलच्या कार्यकारिणीने ही गडबड ठरवून केली. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यशोधन दिवेकर यांनी साथ दिली, असा आरोप भालेराव विचार मंच पॅनेलचे उमेदवार प्रमोद पवार यांनी केला.

संस्थेचे १४०० मतदार असून बहुंताश मतदार गिरगाव व दादर परिसरात राहतात. त्यांना मतपत्रिका १५ दिवसात पोचली नाही. मृत व्यक्तींना मतपत्रिका पाठविण्यात आल्या. मतदारांचे बदलले पत्ते संस्थेने अद्ययावत केले नाहीत. ऊर्जा पॅनेलने संघातील कर्मचारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संगनमत करत ४०० मतपत्रिका लपवून ठेवल्या असून ते ऐनवेळी मतदान पेटीत टाकू शकतात. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आणि कुरिअर कंपनीची चौकशी करावी, अशी मागणी प्रमाेद पवार यांनी केली आहे.

ऊर्जा पॅनेलकडून अश्विनी भालेराव, सुदेश हिंगलासपूरकर, विजय केंकरे, अनिल बांदोडकर तर भालेराव विचार मंचकडून नरेंद्र पाठक, सारंग दर्शने, समीर काेप्पीकर, अनिल गचके असे ९१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ऊर्जा पॅनेलच्या उषा तांबे आणि भालेराव मंचचे किशोर रांगणेकर यांच्यात अध्यक्षपदाची थेट लढत आहे. १८ सप्टेंबर रोजी मतमोजणी आहे.

ही संस्था गेली ८५ वर्षे अविरतपणे मराठी साहित्य आणि मराठी रंगभूमी यांची सेवा करीत आहे. मराठी सांस्कृतिक जीवनाला प्रोत्साहन देत, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत मुंबईतील अग्रगण्य मराठी संस्था बनून राहिली आहे. संस्थेची साहित्यशाखा प्रतिवर्षी जुन्या-नव्या लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव करते; महानगर तसेच महाविद्यालयीन साहित्य संमेलने आयोजित करते; “साहित्य” हे दर्जेदार त्रैमासिक प्रसिद्ध करते; अमराठी भाषिकांसाठी मराठी भाषेचे वर्ग चालवते, पण निवडणुक जाहीर झाल्यापासून दोन्ही पॅनेलकडून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांनी संस्था चर्चेत आली आहे.