मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत (शिंदे) विभागप्रमुखांच्या नेमणूकांवरून सुरू झालेले नाराजीचे सत्र काही संपताना दिसत नाही. विभागप्रमुखांच्या नेमणूकांंवरून सुरू झालेली नाराजी अद्याप पक्षश्रेष्ठींना थोपवता आलेली नाही. नाराजीची रोज नवीन प्रकरणे चर्चेत येऊ लागली आहे. अशीच खदखद शिवडी विधानसभा मतदारसंघातही दिसू लागली आहे. या ठिकाणी पक्षाने माजी नगरसेवक नाना आंबोले यांना विभागप्रमुखपदी नेमले आहे.
मात्र आंबोले हे विधानसभेच्या निवडणूकीत सपशेल हरले होते. इतकेच नाही तर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या नेमणूकीमुळे शिवडी मतदारसंघात शिवसेनेतील (शिंदे) कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. पक्षबांधणी, पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका, जबाबदाऱ्यांचे वाटप आदी कामांना वेग आला आहे. शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर होणारी मुंबई महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असून ही निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेनेसाठी (शिंदे) ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने नुकतीच मुंबईतील विभागप्रमुखांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शिवसेनेतून (ठाकरे) आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र ही यादी जाहीर झाल्यापासून शिवसेनेतील (शिंदे) पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आधी पक्षात कुजबूज होती, आता मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. कोणी नाराज होऊ नये म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुख नेमण्यात आले आहेत. तीन मतदारसंघांचा एक विभागप्रमुख ही पद्धत मोडीत काढून एका मतदारसंघाला एक विभागप्रमुख नेमण्यात आला आहे. पक्षाने आतापर्यंत ३२ विभागप्रमुखांची यादी जाहीर केली आहे. मात्र तरीही पक्षातील नाराजी डोके वर काढू लागली आहे.
नाराजांना सबुरीचा सल्ला
विलेपार्ले येथील जुने शिवसैनिक जितेंद्र जानावळे यांनी समाज माध्यमांवरून आपली नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे यांच्या पक्षात असताना आपल्याला विभागप्रमुखपद मिळाले नाही आणि इथेही मिळाले नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. जानावळे यांच्याप्रमाणेच गोरेगाव- दिंडोशी येथील गणेश शिंदे, चारकोपचे संजय सावंत यांनीही नाराजी व्यक्त केली होती. पश्चिम उपनगरात अनेक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. पश्चिम उपनगरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचाही इशारा दिला होता. या नाराज पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. या सर्व नाराजांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र पालिकेच्या निवडणुकीपर्यंत ही नाराजी दूर करता आली नाही तर पक्षाला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवडीत नाराजी
शिवडीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना आंबोले यांचीही विभागप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली असून त्यावरून या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. नाना आंबोले हे मुळचे शिवसेनेचे नगरसेवक होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना भाजपकडून उमेदवारी अपेक्षित होती. या मतदारसंघात शिवसेनेचे (ठाकरे) अजय चौधरी आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यात लढत झाली होती.
महायुतीने या ठिकाणी उमेदवार दिला नव्हता. भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे आंबोले नाराज होते व त्यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे भाजपने आंबोले यांना पक्षातून निलंबित केले होते. आंबोले यांनी एप्रिल २०२५ मध्ये शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. यावेळी नाना अंबोले यांची वरळी आणि शिवडी विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर काही महिन्यातच त्यांना विभागप्रमुखपदही देण्यात आले. त्यामुळे भाजपने निलंबित केलेल्या व्यक्तीला विभागप्रमुख केल्याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
डिपॉझिट जप्त
विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवलेल्या आंबोले यांना केवळ ५९२५ मते मिळाली होती. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. अशा व्यक्तीला पदाधिकारी केल्याबद्दल पक्षातच नाराजी असल्याची चर्चा आहे.