Mumbai Maratha Reservation Protest Manoj Jarange :मुंबई : राज्य सरकारने आंदोलकांसाठी कोणतीही सोयीसुविधा उपलब्ध न केल्याने शनिवारी सकाळी आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी मुंबई महानगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील रस्त्यावर ठिय्या मांडले. काहींनी महानगरपालिकेसमोर शेगडी पेटवत नाष्टा बनविला तर काहींनी थेट कृत्रिम तलाव उभारून त्यात अंघोळ केली. यामुळे सकाळी ८ वाजल्यापासून या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून करण्यात येत असलेले प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याने अखेर त्यांनी मनोज जरांगे यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर जरांगे यांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केल्यानंतर दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आंदोलक बाजूला झाल्याने अखेर साडेचार तासांनंतर वाहतूक कोंडी फुटली.
आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा निर्धार करत मनोज जरांगे यांनी शुक्रवारी आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले. शनिवारीही मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत दाखल झाले. मात्र मुंबईमध्ये येणाऱ्या आंदोलकांच्या जेवणाची, स्वच्छतागृह, शौचालयाची सरकारकडून कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यातच या परिसरातील हॉटेल, टपऱ्या बंद असल्याने आंदोलकांची जेवणाचेही हाल झाले.
आंदोलकांना सोयीसुविधा पुरविण्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शनिवारी सकाळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई महानगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील रस्त्यावर सकाळीच मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडले. यामुळे फोर्ट, गिरगाव, टपाल कार्यालय, मंत्रालय, जे.जे. उड्डाणपूल, पूर्वमुक्त महामार्ग या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. जे. जे. उड्डाणपूल व पूर्वमुक्त महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यामध्ये बेस्ट बसच्या गाड्या, टॅक्सी, खासगी गाड्या अडकल्या होत्या. यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता.
नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आंदोलकांना रस्त्यावर आंदोलन करण्याऐवजी आझाद मैदानात आंदोलन करावे, असे आवाहन केले. मात्र आंदोलक हटण्यास तयार नसल्याने पोलिसांची अडचण होत होती. त्यामुळे सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झालेली वाहतूक कोंडी हटविण्याचे पोलिसांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत होते. त्यामुळे अखेर पोलिसांची याची माहिती मनोज जरांगे यांना दिली.
यावेळी जरांगे यांनी १२.३० वाजता रस्ता मोकळा करून पोलिसांना सहकार्य करा असे आवाहन आंदोलकांना केले. त्यानंतर जरांगेच्या काही कार्यकर्त्यांनी येऊन याची माहिती दिली. जरांगे यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा करताना पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून आंदोलकांना बाजूला सारण्यास सुरूवात केली. जरांगेच्या आवाहनानंतर अवघ्या काही वेळातच आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला. त्यामुळे सकाळी ८ वाजल्यापासून झालेली वाहतूक कोंडी दुपारी १२.३० वाजता फुटली.
केंद्रीय व शीघ्र कृती दल सज्ज
सरकारकडून कोणतीच सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आली नसल्याने शनिवारी सकाळी मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मोठ्या प्रमाणात जमा झाले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात असताना आंदोलक ऐकत नसल्याने पोलिसांकडून केंद्रीय व शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
बस, झाडांवर चढून आंदोलकांचा निषेध
मराठा आंदोलकांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या बेस्टच्या बसच्या टपावरून चढून आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या समोरील सिंग्नलच्या खांबावर, काही आंदोलक झाडावर तर काही आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेट्सवर चढून जोरदार निदर्शने केली. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या सेल्फी पॉईंटसमोर कपडे काढून आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणा करण्यात येत होत्या.