मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातील तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून या मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी महालक्ष्मी स्पोर्ट्स ग्राऊंड हॉल येथे होत आहे. या मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसराला छावणीचे स्वरूप आलेले आहे. प्रत्येक व्यक्तीची चोख तपासणी व ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जात आहे.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाद निर्माण होऊ नये, यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळे कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. मात्र या कक्षांमध्ये शुकशुकाट दिसत आहे. दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल, तेव्हा मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आदित्य ठाकरे, शिंदे गटाचे मिलिंद देवरा व मनसेचे संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या या मतदारसंघातून आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. या मतदारसंघात काहीशी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे नेमके कोण बाजी मारेल, हे पाहणे निर्णायक ठरेल.
© IE Online Media Services (P) Ltd