मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला असून शहर तसेच उपनगरांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस कोसळत होता. याचबरोबर शुक्रवारी पहाटेदेखील पावसाचा जोर कायम होते. त्यानंतर सांयकाळी पावसाने उसंत घेतली. दरम्यान, मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी अतिमुसळधार, तर पालघरला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई शहर तसेच उपनगरांत शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर होता. मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचले होते. अंधेरी सब वे देखील काही वेळासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने मुंबईत ओढ दिली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर २० जुलैपासून मुंबईत पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत ११.४ मिमी तर, सांताक्रूझ येथे ७४.२ मिमी पावसाची नोंद झाली. शहराच्या तुलनेत उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने शुक्रवारी सकाळी पश्चिम बंगालजवळ किनारपट्टी ओलांडली.

पुढील दोन दिवस ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेशकडे वाटचाल करताना कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होणार आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात शनिवारी सर्वदूर पावसाबरोबरच मुसळधार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग तसेच मुंबई, ठाणे या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर पालघर जिल्ह्यात अतिवृष्टाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर रविवारी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यांनतर सोमवारपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भात पावसाचा जोर

विदर्भात मागील तीन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. याचबरोबर कोकण आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर आहे.

उद्या पावसाचा अंदाज कुठे अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट)

पालघर, पुणे घाट परिसर, चंद्रपूर, गोंदिया

अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, जळगाव, छत्रपति संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा

विजांसह पावसाचा अंदाज (यलो अलर्ट)

धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ

रविवारनंतर पावसाचा जोर कमी

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी पावसाचा जोर कमी होणार आहे. तर, सोमवारपासून कोकण, विदर्भातील पावसाचा जोर कमी होणार आहे.