मुंबई : नात्यांची नवीन परिभाषा उलगडणारा आणि दोन्ही बाजू मांडणारा आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून समीक्षक, प्रेक्षक आणि संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या वातावरणात ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटाची चर्चा बॉलिवूडमध्येही रंगताना दिसत आहे.
बॉलिवूडमधील जीनिलिया देशमुख, सुभाष घई, गजराज राव यांसारख्या नामवंत कलाकारांनी आणि बॉलिवूड समीक्षकांनी चित्रपटाचे व कलाकारांचे भरभरून कौतुक केले आहे. तसेच चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या असून, त्यांच्या प्रतिक्रियांमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढलेली पाहायला मिळत आहे.
‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटातून आजच्या पिढीचे राहणीमान, नात्यांची व्याख्या, त्यातील संघर्ष आणि गोडवा पाहायला मिळत आहे. नातेसंबंधांवर भाष्य करताना चित्रपटात ‘टाईम शेअरिंग’सारख्या एका हटके संकल्पनेवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीतील लोकप्रिय जोडी प्रिया बापट- उमेश कामत, निवेदिता सराफ – गिरीश ओक आणि सुकन्या मोने – संजय मोने यांनी आपल्या सदाबहार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
या चित्रपटाच्या निमित्ताने खऱ्या आयुष्यातील जोडपे प्रिया बापट आणि उमेश कामत हे १२ वर्षांनी चित्रपटात एकत्र काम करीत आहेत. कथानक, आकर्षक गाणी आणि दिग्दर्शनाच्या मांडणीमुळे हा चित्रपट एकंदरीत सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडतो आहे. सिनेमागृहात प्रेक्षक कधी मनसोक्त हसत आहेत, तर काही प्रसंग पाहून त्यांच्या डोळ्यात आपसूकच पाणी आलेले पाहायला मिळत आहे.
गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची कथा समीर कुलकर्णी यांची आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना नात्यांची एक सुखद आणि मनाला भिडणारी सफर घडवत आहे.