बुलढाणा : यंदाच्या चुरशीच्या लढतीत प्रमुख तीन दावेदारापैकी कुणीही जिंकला तर निकाल मात्र धक्कादायकच ठरणार आहे. दुसरीकडे खासदार जाधव जिंकले तर एक महाविक्रम स्थापन होणार आहे. त्यामुळेही यंदाच्या निकालाची उत्सुकता गगनाला भिडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाण्यात यंदा तब्बल २१ उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र मुख्य लढत महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष रविकांत तुपकर यांच्यातच झाल्याचे मानले जात आहे. यापैकी कुणीही जिंकले तरी निकाल धक्कादायकच असे चित्र आहे.

हेही वाचा…महात्मा गांधी यांची प्रतीके अन वर्धा पोलिसांची नाविन्यपूर्ण…

मावळते खासदार प्रतापराव जाधव जिंकले तर तो मागील ६७ वर्षातील महा विक्रम ठरणार आहे. कदाचित भविष्यात देखील तो विक्रम अबाधित राहण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराम राणे यांनी मागील १९५७ , १९६२, १९५७ या तीन लढतीत सलग विजय मिळवून विजयाची ‘हॅट ट्रिक’ केली होती. त्यांचा हा विक्रम मुकुल वासनिक व आनंद अडसूळ सारख्या नेत्यांनाही साधता आला नाही. काँग्रेसचे वासनिक तर अखंडित सेनेचे अडसूळ तीनदा विजयी झाले.

मात्र त्यांना सलग तीन विजयाची किमया करता आली नाही. प्रतापराव जाधव यांनी हा चमत्कार करीत राणे यांच्या विक्रमाची बरोबरी केली. मागील २००९, २०१४ आणि २०१९ या तीन लढतीत ते विजेते ठरले. यंदा ते विजयी झाले तर ते सलग चारदा निवडून येणारे प्रथम (आणि कदाचित शेवटचे?) खासदार ठरतील. हा विजय महाविक्रम ठरणार असून भविष्यात अबाधित राहण्याचीच दाट शक्यता आहे.

हेही वाचा…नागपूर : कामगार दिनी १०८ खासगी सुरक्षारक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड !

दरम्यान, या लढतीत आघाडीचे नरेंद्र खेडेकर जिंकले तर तो विदर्भातील मोठा उलटफेर ठरणार असून जाधवांना पराभूत केल्यास ते ‘जायंट किलर’ ठरतील. आजवरच्या राजकीय कारकिर्दीत केवळ जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकणारा हा नेता थेट दिल्ली गाठणार आहे. जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेला हा नेता थेट खासदारकीच्या खुर्चीवर बसणार आहे. असे झालेच तर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणार आहे.

हेही वाचा…धक्कादायक! गृहमंत्र्यांचे गृहशहर नागपुरात दर दिवशी दोन महिलांवर अत्याचार, तीन वर्षांत २६० हत्याकांड

दुसरीकडे अपक्ष रविकांत तुपकर खासदार झाले तर तो महाराष्ट्र गाजविणारा राजकीय चमत्कार ठरणार. बुलढाणा मतदारसंघाच्या ७२ वर्षातील ते प्रथम अपक्ष खासदार ठरतील. याशिवाय एकाच वेळी दोन सेनेला पराभूत करणारा ‘सुपर मॅन’ म्हणून त्यांची नोंद होईल. तसेच दीर्घ काळ शेतकरी चळवळ चालविणारा मात्र अगदी ग्रामपंचायतची निवडणूक सुद्धा न लढणारा हा शेतकरी नेता थेट खासदार होईल. असे झाल्यास जिल्ह्याचे राजकारण आमूलाग्र बदलेल हे नक्की. आता ४ जूनला कोणत्या दोन नेत्यांना दे धक्का बसतो आणि कोणत्या विक्रमाची नोंद होते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana lok sabha seat results will be shocking if any one wins out of top three contenders scm 61 psg