वर्धा : वाढते गुन्हेगारी विश्व पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. नित्य नवे गुन्हे व गुन्हेगार शोधायचे कसे, हे प्रश्न पडू लागले आहे. या अनुषंगाने पोलीस आता सावध झाले आहे. प्रामुख्याने सायबर गुन्हे पोलिसांना अडचणीचे ठरू लागत असल्याचे चित्र पुढे येते. म्हणून आपल्या शोध कार्यात जनतेची मदत मिळाली तर उत्तमच, असा विचार बळावू लागल्याची स्थिती उभ्या महाराष्ट्रात दिसून येते.
वर्धा पोलिसांनी त्याच भूमिकेतून जागरण करण्याची भूमिका घेतली आहे. वारंवार असे गुन्हे घडत असल्याचे पाहून ‘ प्रिव्हेन्शन इज बेटर देण क्युअर ‘ असा पवित्रा घेतला.
हेही वाचा…नागपूर : कामगार दिनी १०८ खासगी सुरक्षारक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड !
महात्मा गांधी यांची विचार देणारी तीन माकडे सुप्रसिद्ध आहेत. त्याचाच दाखला देत वर्धा पोलीस दलाने आता नवे बोधचिन्ह तयार केले आहे. ओटीपी कुणाला सांगू नका, अनोळखी कॉल ऐकू नका, अनोळखी लिंक बघू नका असा संदेश देणारी ही तीन माकडे दाखवून पोलीस सतर्क राहण्याचा इशारा देत आहे. प्रतीक गांधींजींचे आणि बदलत्या युगाचे प्रतीक म्हणून संदेश देणारी माकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.