चंद्रपूर : मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत आज आरक्षण जाहीर होताच निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेत सलग दुसऱ्यांदा पून्हा एकदा महिला राज येणार आहे. मात्र यावेळी अध्यक्ष पद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाची स्वप्न रंगविणाऱ्या पुरूष नेत्यांचा हिरमोड झाला आहे. तर इच्छुम महिलांनी तयारी सुरू केली आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषदेत एकूण ५६ सदस्य आहेत. यातील सहा जिल्हा परिषद क्षेत्र अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव राहतील. याच राखीव क्षेत्रातून जिल्हा परिषदेची महिला अध्यक्ष निवडली जाणार आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेत आजवर केवळ दोन महिला अध्यक्षांची वर्णी लागली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काॅग्रेसच्या वैशाली वासाडे सलग अडीच वर्षे अध्यक्ष होत्या. त्यानंतर भाजपाच्या संध्याताई गुरूनुले यांनी अडीच अडीच अशी पाच वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सांभाळले आहे. मागील साडेतीन ते चार वर्षापासून प्रशासकाची नियुक्ती असलेल्या चंद्रपूर जिल्हा परिषदेत दहा वर्षापासून भाजपाची सत्ता होती.

भाजपच्या संध्या गुरूनुले यांच्याकडेच अध्यक्ष पदाची सूत्रे होती. आता अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपदाचे आरक्षण निघाल्याने निवडणुकीची रंगत वाढणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणुक अपेक्षित आहे. त्या दृष्टीने भाजप, कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, मनसे, वंचित, रिपाईचे विविध गट, बसपा या पक्षांनी ग्रामीण भागात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अनुसूचित महिलासाठी अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहिर होताच आरक्षणात फिट बसणाऱ्या दुर्गापूर जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडून येणाऱ्या माजी महिला व बालकल्याण सभापती रोशनी खाण यांनी आतापासूनच कामाला सुरूवात केली आहे.

त्यासोबतच कॉग्रेस कडूनही अनेक अनुसूचित जातीच्या महिलांनी कामाला सुरूवात केली आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अधिक निवडुन येतात यावरच अध्यक्ष पदाच्या खुर्चीचे गणित ठरणार आहे. कधीकाळी जिल्हा परिषदेत कॉग्रेसची सत्ता होती. कॉग्रेसने माजी खासदार अब्दुल शफी यांच्यापासून तर माजी राज्यमंत्री वामनराव गड्डमवार, पंजाबराव गावंडे, सुधाकर कुंदोजवार, प्रकाश पाटील मारकवार, संतोष रावत, सतिश वारजूरकर यांच्यासारखे जिल्हा परिषद अध्यक्ष दिले आहेत. तर भाजपाने राजुराचे विद्यमान आमदार देवराव भोंगळे, नामदेव काळे, मारोती परचाके, संतोष कुमरे, संध्या गुरूनुले यांच्यासारखे अध्यक्ष जिल्हा परिषदेला दिले आहेत.

मात्र गटबाजीमुळे कॉग्रेस पक्ष जिल्हा परिषदेत मागील दहा वर्षापासून सत्तेपासून दूर आहे. आता कॉग्रेसला भाजपाकडून सत्ता हस्तगत करायची असेल तर कॉग्रेस नेत्यांना एकदिलाने निवडणुकीत परिश्रम घ्यावे लागणार आहे. तर भाजपाला सत्ता टिकवून ठेवायची असेल तर गटबाजीचे राजकारण सोडून एकदिलाने काम करावे लागणार आहे.

कॉग्रेस नेते माजी विरोधी पक्ष नेेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना एका मंचावर येवून निवडणुकीत काम करावे लागेल तर भाजपचे ज्येष्ठ नेते मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे यांना एकत्र असल्याचा संदेश मतदारांना द्यावा लागणार आहे.