वाशीम : ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा,” या म्हणीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान कायम राहील. विरोधकांकडून ‘संविधान खतरे मे है…’ असा भ्रामक प्रचार केला जात आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ‘संविधान दिवस’ प्रथम साजरा केला आणि त्यांचे काम संविधानाच्या चौकटीतच आहे. उलट काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले होते. ‘काँग्रेस जळते घर आहे,’ असे बाबासाहेब म्हणाले होते. या देशात पंतप्रधान मोदींनी अनेक योजना आणल्याने विकासाची गंगा वाहत असून विरोधक कितीही एकत्र आले तरी जनताच त्यांना नाकारेल आणि मोदी २०३४ पर्यंत पंतप्रधानपदी कायम राहतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ मंगरुळपीर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, की मोदींनी ‘इस्रो’च्या माध्यमातून ‘चांद्रयान’ मोहीम ‘लाँच’ केली. परंतु काँग्रेसला राहुल गांधी यांना ‘लाँच’ करण्यात यश आले नाही. उलट राहुल गांधी विदेशात देशाची बदनामी करतात. काँग्रेसचा नारा आहे ‘गरिबी हटाव,’ मात्र काँग्रेस गरिबी हटवू शकली नाही. मोदींनी ‘रोटी, कपडा, मकान’ दिले. काँग्रेसने मुस्लिमांना ‘व्होट बँक’ म्हणून वापरले. मोदींनी मौलाना आझाद मंडळाचा निधी ५० कोटींवरून पाचशे कोटींवर नेला. उद्धव ठाकरे म्हणायचे, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार, पालखीत बसविणार, पण स्वतःच पालखीत बसले. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, की शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, मग आता तुम्हीच सांगा गद्दार कोण, असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा…शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना

‘मंदिर बनायेंगे, पण तारीख नही बतायेंगे,’ अशी टिंगल सगळे करीत होते. परंतु पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिर बांधले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केले. उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम आम्ही करीत नाही. ‘फेस टू फेस’ काम करतो. माझा मुलगा डॉक्टर आहे मी नाही, मात्र मी डॉक्टर नसताना मोठमोठ्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच राज्यातील सरकार ‘लॉकडाऊन’ सरकार होते. पण आता आमचे सरकार गतिमान सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील, जयदीप कवाडे, महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील, आमदार लखन मलिक, तेजराव वानखेडे, अर्जुन खोतकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा…“भाजपच्या सत्तेत देशात अराजकता,” काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची घणाघाती टीका; म्हणाले, “पराभव दिसत असल्याने…”

‘भावनाताई तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे’

आता भावना गवळी इकडे आल्या आहेत. त्यांनी २५ वर्षे काम केले. तुम्ही पक्षाचा आदेश अंतिम मानला. परंतु तुम्ही काळजी करू नका, हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या पाठिशी आहे, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी याना दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde said narendra modi will remain prime minister till 2034 opposition spreading misleading propaganda pbk 85 psg