अकोला : गेल्या दहा वर्षात राष्ट्राची प्रगती सातत्याने खुंटली. देशात अराजकता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी आज येथे केली. अकोला मतदारसंघातील पातूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार डॉ. अभय पाटील, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नतीकोद्दिन खतिब, आमदार नितीन देशमुख, राष्ट्रीय सचिव आशीष दुवा, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश पदाधिकारी प्रकाश तायडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाला कंगाल करण्याचे षडयंत्र आखले. अनेक प्रकारच्या माध्यमातून ते कट कारस्थान केले जात आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील महागाई, भ्रष्टाचाराने जागतिक पातळीवर भारताची नाचक्की केली, असा आरोप वासनिक यांनी केला. ‘४०० पार’चे आकडे दाखवत असताना दुसरीकडे मोदी सरकारचा विशेष पराभव दिसून येत आहे. भाजपकडील गर्दी ओस पडली. यामुळे सर्वत्र भाजपचे धाबे दणाणले आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला.
हेही वाचा…वरातीसाठी सजवलेला घोडा रात्रीच चोरांनी लांबवला, सकाळी नवरदेव….
सभेत शिवाजीराव मोघे, आमदार नितीन देशमुख, संग्राम गावंडे, आदींनीही मनोगत व्यक्त केले. सभेचे प्रास्तविक प्रकाश तायडे यांनी, तर संचालन मुख्तार शेख यांनी केले. आभार चंद्रकांत बारताशे यांनी मानले.