नागपूर : महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा लवकरच संपणार असून येत्या ८-१० दिवसात याबाबत निर्णय होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सांगितले. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली असली तरी त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे नसल्याने यासाठी महाराष्ट्रातील महायुतीतील मतभेद कारणीभूत आहेत, अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली होती. याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले. फडणवीस म्हणाले “ महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही, केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यावेळी महाराष्ट्रातील जागेबाबत चर्चा झाली नव्हती. लवकरच महायुतीच्या घटक पक्षाशी चर्चा करून आठ-दहा दिवसात जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल.”

हेही वाचा…वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढेच जानकर म्हणाले “…अन्यथा भावना गवळी …”

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले की, राणा आमच्या सहयोगी सदस्य आहेत. मागील पाच वर्ष त्यांनी लोकसभेत एनडीए व मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्या नागपूरमधील भाजयुमोच्या कार्यक्रमात सहभागी होत आहे. यात वेगळे काहीच नाही. त्या आमच्या सोबत राहतील.