Mahayuti Alliance Collapse in Vidarbha BJP Strategy : विदर्भात मित्रपक्षांच्या तुलनेत बरेच समोर असलेल्या भाजपने ‘स्थानिक’च्या निवडणुकीत एकला चलो रे चे धोरण अंगीकारले असून एखाद-दोन ठिकाणचा अपवाद वगळता अजितदादांच्या राष्ट्रवादीला व शिंदेंच्या सेनेला चक्क वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे लोकसभा व विधानसभेच्या वेळी घट्ट दिसून आलेली महायुतीची वीण पूर्णपणे विस्कटली असून भविष्यात याचे अनेक स्तरावर पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेनेची पिछाडी; भाजपची झेप
गेल्या अनेक दशकापासून विदर्भात काँग्रेस व भाजप या दोनच राष्ट्रीय पक्षांचा प्रभाव राहिला आहे. १९९०च्या दशकात हा प्रदेश पूर्णपणे काँग्रेसमय होता. त्याला पहिल्यांदा छेद दिला तो शिवसेनेने. तेव्हा गाजलेल्या ‘रिडल्स’ प्रकरणाचा आधार घेत सेनेने विदर्भात बस्तान बसवले. त्याकाळी भाजप कुठेही नव्हता. तेव्हा मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या सेनेसोबत भाजपने युती केली. नंतर हळूहळू भाजप वाढला व सेना पिछाडली गेली. तरीही २०१४ पर्यंत सेना पश्चिम विदर्भात मोठ्या भावाच्या भूमिकेत होती. फुटीनंतर त्याचा फायदा भाजपने उचलला व केवळ ठाकरेच नाही तर शिंदेसेना सुद्धा या भागातून माघारली.
मित्रपक्षांपासून लांबच
आता काँग्रेसची संघटनात्मक शक्ती क्षीण झाल्याचा फायदा उचलत भाजपने विदर्भात आघाडी घेतली आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी या पक्षाने एकला चलो रे चे धोरण स्वीकारले आहे. ‘मुंबई वगळता शक्य असेल तिथे युती करू’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानुसार निवडणुका जाहीर झाल्यावर अनेक ठिकाणी युतीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ चालले. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही असे चित्र विदर्भात सर्वदूर आहे. आजच्या घटकेला वाशीम जिल्ह्यातील रिसोड पालिकेत फक्त महायुती अस्तित्वात आली आहे. याच जिल्ह्यात इतर तीन ठिकाणी मित्रपक्ष स्वतंत्रपणे रिंगणात आहेत.
बुलढाण्यात शिंदेसेनेचा प्रभाव आहे. केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आहे. तिथेही भाजपने शिंदेच काय पण अजितदादांशी सुद्धा युती करण्याचे टाळले आहे. अकोल्यात भाजपचाच वरचष्मा आहे. तिथेही मित्रपक्षांना विचारण्याचे सौजन्य भाजपने दाखवले नाही. अमरावतीत सुद्धा अशीच स्थिती आहे. भाजपकडून विचारणा होत नाही हे लक्षात येताच तिथे दर्यापूरसारख्या ठिकाणी अजितदादा व शिंदे एकत्र आले आहेत. यवतमाळमध्येही हे दोन पक्ष एकत्र आले असून भाजप स्वतंत्रपणे लढत आहे. वर्धेत महायुती घडावी म्हणून भरपूर प्रयत्न झाले पण त्यात यश आले नाही. भंडाऱ्यात अजितदादांच्या पक्षाचा प्रभाव बऱ्यापैकी आहे. इथेही भाजपने त्यांना सोबत घेण्याचे टाळले आहे.
गोंदियात भाजपकडून चालढकल केली जात आहे हे लक्षात येताच दादांच्या पक्षाने ठाकरे सेनेला खिंडार पाडून पदाधिकाऱ्यांना सोबत घेत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गडचिरोलीत दादा व शिंदे एकत्र आले आहेत. या जिल्ह्यातील अहेरी भागात दादांच्या पक्षाचा जोर आहे. त्याला भाजपने आव्हान दिले आहे. चंद्रपुरात महायुती कुठेही आकाराला आली नाही. त्यामुळे चिडलेल्या दादा व शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी कुठे एकत्र तर कुठे स्वतंत्रपणे चूल मांडली आहे.
नगराध्यक्षपद कळीचा मुद्दा
विदर्भात बहुसंख्य ठिकाणी महायुती न होण्यामागे भाजपने नगराध्यक्षपदासाठी धरलेला आग्रह हेच कारण समोर आले आहे. विदर्भातून जास्तीत जास्त अध्यक्ष निवडून आणण्याचे लक्ष्य भाजपने निर्धारित केले आहे. राज्यात इतर ठिकाणी मित्रपक्षांशी तडजोड केली तरी चालेल पण विदर्भात नको अशी या पक्षाची भूमिका राहिली आहे. विदर्भात सध्या काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेत जास्तीत जास्त अध्यक्ष निवडून आणायचे अशी रणनीती भाजपने आखली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षातील मतभेद दिसायला नको म्हणून भाजपने नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर केले नाहीत.
उमेदवारांना दूरध्वनी करून अर्ज भरण्यास सांगण्यात आले. आता मुदत संपल्यावर मित्रपक्षांवर दबाव टाकून त्यांच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावायची व आघाडी मिळवायची असे धोरण भाजपने आखले आहे. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे लवकरच दिसेल. ही रणनीती लक्षात आल्यामुळे दादा व शिंदेंच्या पक्षनेत्यांची चिडचिड वाढली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच त्याला वाट मोकळी करून दिली. केवळ पैशाने निवडणुका जिंकता येत नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला. या निवडणुकीत मित्रपक्षांची गोची करण्याचे भाजपचे धोरण सध्यातरी यशस्वी झाले आहे. अर्ज माघारी घेण्यास आणखी काही दिवस आहेत. या काळात कुठे तडजोड होते व कुठे मित्रपक्ष एकमेकांविरोधात लढतात हे बघणे मनोरंजक ठरणार आहे.
फायदा उचलण्यात काँग्रेस अपयशी
महायुतीतील या वादाचा फायदा उचलण्यात काँग्रेसला विदर्भात अद्यापतरी यश आलेले नाही. अपवाद फक्त भद्रावतीचा. येथे महायुतीतील वादाचा फायदा घेत काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारालाच पक्षात आणले व लगेच उमेदवारी जाहीर करून टाकली. इतर ठिकाणी काँग्रेसला अशी चपळाई दाखवता आली नाही. महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीत सुद्धा मतभेदाचे चित्र तीव्र आहे. त्यामुळे सर्वत्र बहुरंगी लढती होण्याची शक्यता वाढली आहे.
