नागपूर : मध्य प्रदेशातील परिवहन खात्याने नागद्वार यात्रेसाठी महाराष्ट्रातील एसटी बसला अखेर परवानगी दिली. हा तिढा सुटल्याने यात्रेच्या दुसऱ्या दिवशी २० जुलैपासून एसटीच्या विशेष बसफेऱ्या सुरू होतील. परंतु अनेक वर्षानंतर प्रथमच यात्रेच्या पहिल्या दिवशी नागद्वार यात्रेसाठी विशेष बस पाठवता आली नाही.

मध्य प्रदेशातील परिवहन खात्याने एसटी महामंडळाच्या बसेसला धार्मिक कार्यक्रमाच्या विशेष अटीवर पचमढीतील नागद्वार यात्रेसाठी परवानगी दिल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील मोटार वाहन कायद्यात अशी तरतुद होती तर आतापर्यंत परवानगी का रोखून धरली, असा प्रश्न भाविकांकडून विचारला जात आहे.

दरम्यान एसटीला शनिवारी मध्य प्रदेशच्या परिवहन खात्याकडून वाहतुकीचा परवाना मिळाल्याने आता २० जुलै ते ३० जुलै दरम्यान दहा दिवस एसटीकडून विशेष बस सोडल्या जाणार आहेत. एसटी महामंडळाकडून नागपूर ते पचमढी, पचमढी ते नागपूर दरम्यान दुपारी ३ वाजतापासून रात्री उशिरापर्यंत रोज २४ फेऱ्यांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार रविवारपासून नागद्वारयात्रेसाठी एसटीच्या नियमित बस धावणार आहेत.

प्रकरण काय?

प्रत्येक वर्षी एसटी महामंडळाच्या नागपूरसह विदर्भाच्या विविध भागातून मध्य प्रदेशच्या पचमढी येथील नागद्वार यात्रेसाठी विशेष बस चालवल्या जातात. तेथे विदर्भाहून लाखोच्या संख्येत भाविक जात असल्याने खासगी ट्रॅव्हल्सकडून लुट होऊ नये म्हणून ही सोय केली जाते.

दरम्यान यंदाही एसटीकडून परवान्यासाठी अर्ज केला गेला होता. त्यासाठी सात लाखाहून अधिकची रक्कम तेथील परिवहन कार्यालयाकडे जमाही केली गेली होती. परंतु पन्नास आसन क्षमतेहून अधिकच्या बसेसलाच परवानगी देता येत नसल्याच्या नियमावर बोट ठेवत एसटीला परवाना नकारला गेला. दरम्यान एसटीकडे पन्नास आसण क्षमतेच्या बस नसून ४४ आसन क्षमतेच्याच बस आहेत.

दुसरीकडे मध्य प्रदेशच्या कमी आसन क्षमतेच्या बसेस मात्र रोज नागपुरात येत असल्याचे निरीक्षण येथील प्रवाश्यांकडून नोंदवले जातात. त्यातच हा प्रकार लोकसत्ताने पुढे आणल्यावर बातमीची दखल घेत विधान परिषदेतही आमदार अभिजित वंजारी यांनी शासनाच्या निदर्शनात हा मुद्दा आणला. तर दुसरीकडे आमदार प्रवीण दटके यांनी हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला. त्यानंतर फडणवीसांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी भ्रमनध्वनीवर चर्चा केली.

त्यामुळे परवाना मिळणार असल्याचा दावाही दटके यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला होता. परंतु यात्रेच्या पहिल्याच दिवशी परवाना नसल्याने एसटी बसची वाहतूक भाविक करू शकणार नाही. परंतु या मुद्यावर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची शनिवारी पून्हा मध्य प्रदेशातील परिवहन अधिकाऱ्यांसी चर्चा होणार होती.