नागपूर : बेधडक वक्तव्य… बोचऱ्या कानपिचक्या आणि पक्षाच्या पलिकडे जाऊन मदत करणारे नेते अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महाराष्ट्रच नाही तर देशभर ख्याती आहे. त्यामुळेच ते सतत चर्चेतही राहतात. प्रसंगी आपल्याच पक्षातील नेत्यांवरच काय तर धोरणांवरही बोलायला गडकरी कचरत नाहीत. त्याची प्रचिती शनिवारी पुन्हा एकदा नागपूरकरांना आली.
बालकला अकादमी व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित विदर्भस्तरीय खासदार चषक आंतरशालेय देशभक्ती समूहगीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जाहिरपणे याची कबूली दिली.
स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस, बालकला अकादमीच्या अध्यक्ष मधुरा गडकरी, सीमा फडणवीस, सुप्रसिद्ध गायक व स्पर्धेचे परीक्षक अनिरूद्ध जोशी उपस्थित होते.
गीत, संगीतामुळे मनाला आनंद, समाधान मिळते, असे सांगत गडकरी म्हणाले, देशभक्तीपर गीते ही केवळ शब्द नसतात तर यातून मुलांच्या मनावर संस्कार होऊन राष्ट्रहिताचे व्यक्तिमत्व घडत जाते. प्रास्ताविकातून स्पर्धेमागची भूमिका विषद करताना मधुरा गडकरी म्हणाल्या, गेल्या १७ वर्षांपासून सुरू असलेली ही स्पर्धा पहिल्यांदाच विदर्भस्तरावर झाल्याचे त्यांनी नमूद केले. फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले. परीक्षक गायक गुणवंत घटवाई, संगीतकार शैलेश दाणी व अनिरूद्ध जोशी यांचा सत्कार करण्यात आला. मनिषा महात्मे यांनी संचालन करीत आभार मानले. अविनाश घुशे, सचिन बक्षी, सुबोध आष्टीकर आदींची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
२५ गीतांचे होणार २८ सप्टेंबरला लोकार्पण
शाळेत गायिली जाणारी २५ गीते निवडून शंकर महादेवन यांनी त्याला संगीत साज चढवला आहे. येत्या, २८ सप्टेंबरला सुरेश भट सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षपूर्ण झाल्यानिमित्ताने त्यांचे लोकार्पण होणार आहे. शाळांपर्यंत ही गीते पोहोचावी व त्यांचे बालमनावर उत्तम संस्कार व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे, असे गडकरी म्हणाले.
नेमके काय म्हणाले गडकरी…
अपघात टाळण्यासाठी देशभर विविध उपक्रम सुरू आहेत. धोरणात्मक कार्यक्रमही राबवले जात आहेत. मात्र त्याला म्हणावे तितके यश आलेले नाही. वाहतूक नियमांबद्दल जागृतीचा अभाव अससल्याने हे घडत आहे. त्यामुळे आजही हजारो लोक रस्ते अपघातात बळी पडतात. यातून धडा घेत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्याकडून ‘रोड सुरक्षे’वर गीत तयार करून घेण्यात आले आहे. ते आता मराठीसह २२ भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे, असे संकेत केंद्रिय मंत्री गडकरी यांनी दिले.