नागपूर : सुषमा अंधारे या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील उपनेत्या असून त्या आपल्या आक्रमक आणि प्रभावी वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत.
मराठवाड्यातील पाडोळी येथे जन्मलेल्या अंधारे यांनी एम.ए., बी.एड. आणि कायद्याचे शिक्षण घेतले असून त्या सामाजिक समता, आंबेडकरी विचारसरणी आणि स्त्रीवादी चळवळीशी दीर्घकाळ जोडल्या गेल्या आहेत. २८ जुलै २०२२ रोजी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आणि अल्पावधीतच उपनेत्या पदावर विराजमान झाल्या. त्यांच्या बोलण्याची शैली तिखट, थेट आणि आक्रमक असल्याने त्या शिवसेनेच्या पारंपरिक “फायरब्रँड” प्रतिमेला अनुसरतात.
विरोधकांवर कठोर प्रहार करणे, सामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका घेणे आणि “महा प्रबोधन यात्रा”सारख्या उपक्रमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचणे यातून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. काही जुन्या वक्तव्यांमुळे त्यांना वादालाही सामोरे जावे लागले. आता त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक नवे वादग्रस्त विधान केले. फडणवीस यांचे होम टाऊन असलेल्या नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमातच त्यांनी हे वक्तव्य केले.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
भाजप हा काही मोठा पक्ष नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करून भाड्याने जमवलेली पार्टी म्हणजे भाजप होय, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. सत्ताधारी पूरग्रस्त भागात पर्यटन करत आहे. पीएम केअर फंडाबाबत काही विचारायची मुभा नाही. फंडमध्ये १० हजार ९९० कोटी जमा झाले मात्र खर्चाचा हिशोब कुणाकडेच नाही. ईडी, सीबीआय, निवडणूक आयोगासह या स्वायत्त संस्थांसह न्यायालयांमधूनही न्याय मिळत नाही.
अशा परिस्थितीत न्यायासाठी रस्त्यांवर उतरण्याखेरीज पर्याय नसल्याचे अंधारे म्हणाल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत अंधारे यांनी सांगितले की एकीकडे राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ५० हजार प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहे. मात्र फडणवीसांकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही.
दुसरीकडे, फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर २१ लाख रुपयांचा पलंग लावण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी पैसै मागितल्यावर ते राजकारण आणू नका असा सल्ला त्यांना देत आहे.
महायुतीचे इतर नेतेही पूरग्रस्त भागात राजकीय पर्यटन करण्यासाठी जात आहेत, अशी टीका अंधारे यांनी केली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हे पूर्वीचे भाजपचा प्रवक्त असतो. त्यामुळे आम्ही न्याय मागायचा कुणाकडे असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले.