जळगाव – काही दिवसांपासून विजनवासात राहिलेले ज्येष्ठ नेते सुरेश जैन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यापासून अचानक चर्चेत आले आहेत. महापालिका काबीज करण्यासाठी एकीकडे भाजप त्यांची मदत घेण्याच्या प्रयत्नात असतानाच, राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही जैन यांची भेट घेतली आहे. सर्व घडामोडी लक्षात घेता जळगावच्या राजकारणावर सुरेश जैन यांचा प्रभाव कायम असल्याची प्रचिती आली असून, त्यांची मदत घेण्यासाठी राजकीय चढाओढ सुरू झाली आहे.

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते खासदार संजय राऊत मे महिन्यात जिल्हा दौऱ्यावर असताना जळगाव विमानतळावर योगायोगाने सुरेश जैन आणि त्यांची भेट झाली होती. त्यावरून जैन यांच्या भेटीचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न ठाकरे गट करत असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र, जैन यांनी आपण राजकारणात पुन्हा सक्रीय होणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली होती. तर जैन अजूनही आमचे नेते असल्याचा दावा करून खासदार राऊत यांनी त्यावेळी भाजपसह शिंदे गटाला कोड्यात पाडले होते.

मराठीच्या मुद्द्यावर मनसे आणि ठाकरे गटाने मुंबईत नुकत्याच आयोजित केलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी सुरेश जैन हे १९९९ मध्ये मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, ते अमराठी असल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच तेव्हा त्यांच्या नावाला तीव्र विरोध दर्शविला होता, असा गौप्यस्फोट केला. राज ठाकरे यांच्या त्या विधानामुळे सध्या राजकारणापासून अलिप्त असलेले सुरेश जैन पुन्हा चर्चेत आले.

दरम्यान, भाजप जळगाव महापालिका काबीज करण्यासाठी सुरेश जैन यांची मदत मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपने जैन यांचा पाठिंबा मिळविला होता. जैन यांना मानणारा शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) १३ माजी नगरसेवकांचा गट फोडण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे स्वतः जैन यांची मनधरणी करीत असल्याचेही बोलले जाते.

काही दिवसातील या सर्व घडामोडींमुळे सुरेश जैन हे राजकारणापासून अलिप्त असले, तरी प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. अजित पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी जैन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जळगावचे राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.

ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांची अधुनमधून भेट होत असते. शुक्रवारच्या भेटीदरम्यानही सामाजिक आणि स्थानिक विकासाच्या विषयांवर आमचा मनमोकळा संवाद झाला. – गुलाबराव देवकर (माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गट, जळगाव).