जळगाव – मुक्ताईनगरात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर गुरूवारी रात्री उशिरा सशस्त्र दरोडा पडला. पाच दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून एक लाखाहून अधिक रक्कम लुटली. या घटनेनंतर आमदार एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर ताशेरे ओढले आहेत. गुन्हेगारांना राजकीय संरक्षण तर नाही, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर गुरूवारी साडेअकराच्या सुमारास दोन दुचाकीवर पाच जण आले होते. त्यांनी आजुबाजुला कोणी नाही हे लक्षात घेऊन पंपावरील माळी आणि खोसे या दोन्ही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्याला गावठी बंदूक लावून जवळपास एक लाख रुपयांची रोकड त्यांच्याकडून हिसकावून घेतली. तसेच पंपाच्या कार्यालयातील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही डीव्हीआर आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशिषकुमार अडसूळ हे कर्मचाऱ्यांसह पेट्रोल पंपावर पोहोचले.
मात्र, तोपर्यंत सर्व दरोडेखोर बोहर्डी गावाच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झाले होते. न्यायवैद्यक पथकाच्या मदतीने संशयितांचा शोध घेतला जात असून, पोलिसांचे दुसरे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात दहिवद येथे पेट्रोल पंपावर दरोडा पडला होता. त्यानंतर मुक्ताईनगर शहराजवळील महामार्गावर गुरुवारी रात्री उशिरा सशस्त्र दरोडा पडला. दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यात मे महिन्यातही चोपडा तालुक्यातील हातेड येथे एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, चोपडा ग्रामीण पोलिसांना त्यावेळी दरोडेखोरांचा प्रयत्न हाणून पाडला होता.
दरम्यान, राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दरोडा पडलेल्या रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपाला शुक्रवारी भेट दिली. पोलिसांकडून संशयितांच्या तपासाविषयीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्था स्थितीवर त्यांनी ताशेरे ओढले.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचीच संपत्ती सुरक्षित नसल्यावर सर्व सामान्य नागरिकांचे काय, वर्दळीच्या ठिकाणी भरवस्तीत असलेल्या पेट्रोल पंपावर रात्री अकाराच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडत असेल तर पोलीस यंत्रणा काय करत आहे, असे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात गावठी बंदुका, गांजा, ड्रग्ज, गुटखा, शस्त्रे आढळून आली आहेत. असले प्रकार संबंधित गुन्हेगारांना कोणाचे तरी राजकीय संरक्षण असल्याशिवाय वाढूच शकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.