नाशिक: दिंडोरी मतदार संघातील पंतप्रधानांच्या जाहीर सभेत युवा कांदा उत्पादकाने प्रश्न मांडायचा प्रयत्न केल्यावर त्याला जय श्रीराम असे उत्तर मिळाले. त्यामुळे महाराष्ट्राला भाजपचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते कळले, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

पिंपळगाव बसवंत येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत किरण सानप या शेतकऱ्याने उभे राहून कांद्यावर बोला, अशा घोषणा दिल्या होत्या. या युवकाने नंतर शरद पवार यांची भेट घेतली. जाहीर सभेत पवार यांनी कांद्यावरून घोषणा देणारा आपला कार्यकर्ता असेल तर, त्याचा अभिमान असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आपण त्यांना भेटायला आल्याचे सानप यांनी सांगितले. भेटीत पवार यांनी, पोलिसांनी काही त्रास दिला का, अशी विचारणा केली. मोदींच्या सभेत आपण एक शेतकरी म्हणून गेलो होतो, असे सानप यांनी माध्यमांना सांगितले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सानपच्या धाडसाचे कौतुक केले. सानप यांनी जी भूमिका घेतली ती, शेतकऱ्यांसाठी होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा : भुजबळ यांच्याकडून उघडपणे नाराजी व्यक्त, महायुतीतील खदखद पुन्हा चव्हाट्यावर

घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. मूळ प्रश्न फलक बेकायदेशीर होता हा आहे. कुठलाही मोठा प्रश्न निर्माण झाला की, भाजप आरोप करून मूळ प्रश्नाला बगल देण्याचे काम करतो, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडूनही भाजपला जनाधार मिळत नसल्याने त्यांनी आणखी एका पक्षाला बरोबर घेतले. जेवढे पक्ष त्यांनी एकत्रित केले ते, जनाधार कमी करणारे आहेत. चार जूनला निकालानंतर हे भाजपच्या लक्षात येईल. निकालांनंतर महायुतीत पळापळ सुरू होईल, असा दावा पाटील यांनी केला.

हेही वाचा : तेजस गर्गे अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी

मंत्र्यांच्या बॅगा तपासणीवर संशय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगा जेव्हा वजन होते, त्यावेळी तपासल्या गेल्या नाहीत. हलक्या बॅगा तपासण्याचे नाटक करण्यात आले, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. नाशिकमध्ये प्रचारार्थ आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगांची तपासणी भरारी पथकाने केली. गतवेळी हेलिकॉप्टरमधून आलेल्या मुख्यमंत्र्यांनी बँगांमधून मोठ्या प्रमाणात पैसे आणल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या संदर्भातील प्रश्नावर पाटील यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेतला. देशमुख यांनी अनेकांनी आरोप केल्यामुळे यंत्रणेने बॅग तपासणीचे नाटक केल्याचे नमूद केले.