नाशिक – जिल्ह्यात अतिवृष्टीने १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मालेगाव, नांदगाव, सुरगाणा तालुक्यात हे प्रमाण अधिक असल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. महायुती सरकारमध्ये स्थानिक चार मंत्री असूनही दादा भुसे आणि माणिक कोकाटे यांनी नुकसानीची अद्याप पाहणी केलेली नाही.
ज्या छगन भुजबळ आणि नरहरी झिरवळ या मंत्र्यांनी पाहणी केली, त्यांची धाव आपापल्या मतदारसंघापर्यंत सिमित राहिली. राज्याचे प्रतिनिधित्व करणारे हे मंत्री स्थानिक पातळीवर अधिक नुकसान झालेल्या भागात फिरकले नाहीत.
सोमवार आणि मंगळवारी असे सलग दोन दिवस काही भागात जोरदार पाऊस झाला. मालेगाव, नांदगाव, सुरगाणा तालुक्यात सुमारे १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीने कापूस, मका, कांदा, बाजरी, सोयाबीन डाळिंब आदी पिकांना फटका बसला. जवळपास १४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.
येवला, निफाडसह पेठ तालुक्यातही पाऊस झाला. काही भागातील नुकसानीची आकडेवारी अद्याप स्पष्ट झालेली नाही. २० हजारहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे मंत्री आणि आमदारांना आपापल्या भागात नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ आणि नरहरी झिरवळ यांनी नाशिककडे धाव घेतली. या पक्षाचे तिसरे मंत्री माणिक कोकाटे हे मुंबईत रमले होते. जे मंत्री नाशिकला दाखल झाले, त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात जाणे पसंत केले.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा येवला-लासलगाव हा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यांनी येवला तालुक्यातील गवंडगाव, रस्ते सुरेगाव, पिंपळखुटे खुर्द, वाघाळे आणि निफाड तालुक्यातील कोटमगाव व वनसगाव येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी पेठ तालुक्यातील तोंडवळ, आडगाव, अध्रृटे, खोकरतळे, बिलकस, केळविहीर, रानविहीर, आडगाव भूवन आदी गावांना भेट दिली. ही गावे त्यांच्या दिंडोरी मतदारसंघातील आहेत. नागली, वरई, भात, उडीद, वाल पिकांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. उभय मंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. कृषी विभागाला नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
भुजबळ आणि झिरवळ हे दोन्ही मंत्री ज्या भागात सर्वाधिक नुकसान झाले, तिथे गेले नाहीत. अतिवृष्टीत मालेगाव तालुक्यातील (३४), नांदगाव तालुक्यातील (२८), सुरगाणा तालुक्यातील (तीन) अशी जिल्ह्यांतील एकूण ६५ गावे बाधित झाली. मालेगाव हा शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा तालुका आहे. तर, नांदगाव हा भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचा मतदारसंघ आहे.
शिंदे गटातील लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात जाणे मंत्री भुजबळ यांनी टाळले. तर झिरवळ यांनीही आपला दौरा केवळ आपल्या मतदारसंघापुरताच मर्यादित ठेवल्याचे समोर आले.