नाशिक – मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई आणि घोषित मदत त्वरीत द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

राज्यात काही भागात सतत पाऊस पडत असल्याने ओला दुष्काळसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने सध्या उघडीप घेतली असली तरी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही गावांना पावसाचा तडाखा बसल्याने शेतीमालाचे नुकसान झाले. शिवाय दैनंदिन वापरात असलेल्या साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असतांना सरकार दरबारी पंचनाम्याचे घोंगडे भिजत आहे. राजकीय पटलावर याविषयी आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली. मात्र मदत प्रत्यक्षात द्यावी, यासाठी ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. हजारो शेतकऱ्यांची शेती अतिवृष्टी आणि पुरामुळे वाहून गेली आहे. अनेकांचे घर, जनावरे, शेतीची बांधकामे वाहून गेले. विहीरी बुजल्या गेल्या. कर्ज फेडण्याची कुठलीही क्षमता शेतकऱ्यांमध्ये शिल्लक राहिलेली नाही.

केंद्र सरकारकडे प्रस्ताव न पाठवता घोषणा करणे म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल असल्याचा आरोप उपनेते दत्ता गायकवाड यांनी केला. दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे सांगण्यात आले. परंतु, निधी प्रक्रिया, मंजुरी आणि निधीवाटप याविषयी काहीच स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. हेक्टरी मोजमापानुसार मदत देणे अन्यायकारक असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

पूरग्रस्त आणि शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्याची अट न ठेवता हेक्टरी ५० हजार रुपये अशी सरसकट मदत द्यावी, ज्या शेतकऱ्यांची जमीन पूर्ण नष्ट झाली, विहिरी व शेतीचे बांधकाम वाहून गेले, त्यांना विशेष भरपाई पॅकेज देण्यात यावे, जाहीर करण्यात आलेले ३१, ६२८ कोटीचे पॅकेज तातडीने प्रत्यक्षात द्यावे, दिवाळीपूर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, कर्जमाफी आणि हमीभाव योजना त्वरीत लागू करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष आपत्ती निवारण निधी तयार करण्यात यावा, मागण्या पूर्ण होईपर्यंत पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनात जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, माजी आमदार वसंत गीते आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.