नाशिक – महाराष्ट्रातील राजकारणात महायुती सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना नाशिकशी संबंधित असलेला एक राजकीय प्रश्न अजूनही सोडविता आलेला नाही. विश्वगुरु तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही कदाचित या प्रश्नाचे उत्तर नसेल, अशी खात्री झाल्याने आता हा प्रश्न थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरबारात नेण्याचा महायुतीतील भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तीनही घटक पक्षांच्या मंत्र्यांनी चंग बांधलेला दिसतो. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी कोणाचे कसे संबंध आहेत, याविषयी या मंडळींनी केलेली मिश्किल टिप्पणी नाशिकच्या राजकारणात रंगत आणणारी ठरली आहे.

सिंहस्थ कुंभमेळा, द्राक्षे, कांदा आणि वाईन यामुळे नाशिकची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहेच. परंतु, राजकारणामुळे नाशिकला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न याआधी कधी झाला नव्हता. एका राजकीय प्रश्नाने महायुतीतील तीनही पक्षांना ग्रासले आहे. महायुती सरकार महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर आल्यापासून मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा त्यांनी आपल्यापरीने प्रयत्न केला आहे. परंतु, नाशिकशी संबंधित राजकीय प्रश्न सोडविण्यात त्यांनाही अपयश आले आहे. त्यामुळेच कदाचित हा प्रश्न आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच सोडवू शकतील, आणि ट्रम्प यांच्याशी कोणाचे कसे संबंध असू शकतात, याविषयी भाजपचे गिरीश महाजन, शिंदे गटाचे दादा भुसे आणि अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री दाखले देऊ लागले आहेत. असा हा प्रश्न आहे तरी कोणता ?

महायुती पुन्हा सत्तेवर आल्यापासून त्यांना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न सोडविता आलेला नाही. आगामी महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पालकमंत्रीपदासाठी भाजपकडून गिरीश महाजन, शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ ही नावे चर्चेत आहेत. एकाचे नाव जाहीर केल्यास इतर दोन पक्ष नाराज होण्याची धास्ती असल्याने या प्रश्नावर निर्णय घेण्याचे महायुती टाळत आहे. यासंदर्भात दादा भुसे यांनी अलिकडेच पालकमंत्रीपदाचा प्रश्न ट्रम्प साहेबांकडे द्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावर पालकमंत्रीपदाचे त्यांचे स्पर्धक भाजपचे गिरीश महाजन यांनी, दादा भुसे यांचे ट्रम्प यांच्याशी काही संबंध असतील तर आपणास माहीत नाही, असे उत्तर दिले.

माझे अमेरिकेशी तसे काही संबंध नाहीत. मी अमेरिकेला गेलेलोही नाही. दादांचे तसे काही संबध असतील तर ते ट्रम्प यांना सांगतील, अशी मिश्किल टिप्पणी केली. या दोन स्पर्धकांमधील शाब्दिक चढाओढीत ज्येष्ठ नेते आणि पालकमंत्रीपदाचे तिसरे स्पर्धक छगन भुजबळ हे मागे कसे राहतील ? भुजबळ यांनीही डोनाल्ट ट्रम्प आणि नाशिकचे पालकमंत्रीपद यासंदर्भात मत मांडले. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी दादा भुसे, गिरीश महाजन ट्रम्प यांच्याकडे जाणार असल्याचे मी ऐकले आहे. इतक्या लांब मी जाऊ शकत नाही. मी फार तर अजितदादा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊ शकतो. अधिकाधिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊ शकतो, असे भुजबळ यांनी नमूद केले.

महायुतीचे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक मंत्री संबंधित विषय डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे नेण्यासाठी उत्सुक असले तरी  ट्रम्प यांची मानसिकताही विचारात घेण्याची गरज आहे. टॅरिफ प्रकरणावरुन डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे संबंध काहीसे बिघडले असताना नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आपल्याकडे आलाच आणि आपण तो सोडवला तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्यावर खुश होतील म्हणून ट्रम्पही हा प्रश्न आपल्याकडे कधी येतो, याची वाट पहात असल्याचे कळते. शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळाल्याने नाराज असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न सोडविला तर पुढील शांततेचे नोबेल आपल्यालाच मिळू शकेल, असे ट्रम्प यांना त्यांचे सहकारी पटवून देत असल्याचेही समजते.