नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाहणीसाठी आज (१२ जुलै, शनिवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईच्या दौरा केला. या वेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित पत्रकारांनी वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) स्थलांतराच्या चर्चांबाबत विचारणा केली असता, “मुंबई एपीएमसी स्थलांतरित होण्याचा कुठलाही विषय नाहीए. यासंबंधी चर्चा सुरू असली तरी व्यापारी, शेतकरी आणि माथाडी कामगार यांचा विश्वास संपादन केल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, त्यामुळे जो काही निर्णय होईल तो या तिघांच्याही हिताचा निर्णय आम्ही घेऊ” असे स्पष्ट विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मुंबई एपीएमसीच्या स्थलांतरासंदर्भात सध्या सिडको व नवी मुंबई महापालिका विविध पर्यायी जागांची चाचपणी करत आहेत. उलवे, पालघर आदी भागांचा विचार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.
६ महिन्यांपूर्वी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बाजार पेठेचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी त्यांनीही मुंबई एपीएमसी बाजारपेठ नवी मुंबईची आन,बान आणि शान आहे. त्यामुळे याचे स्थलांतर न करता नवीन विस्तारित आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तयार केली जाईल अशी माहिती रावल यांनी दिली होती. यालाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे.
मुंबई एपीएमसीचे महत्त्व
वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि देशातील अग्रगण्य बाजार समित्यांपैकी एक आहे. फळे, भाजीपाला, डाळी, कडधान्ये, कांदा-बटाटा अशा सर्व विभागांसह येथे दररोज हजारो टन शेतीमालाची खरेदी-विक्री होते.
देश आणि परदेशातून दररोज सुमारे २५ ते ३० हजार शेतकरी आणि व्यापारी याठिकाणी व्यवहारासाठी येत असतात, तर सुमारे १ लाख पेक्षा अधिक लोकांचा रोजगार या मार्केटशी निगडित आहे, त्यात माथाडी, हमाल, वाहतूकदार, गोदाम कामगार, छोटे व्यापारी व मदतनीस यांचा समावेश आहे.
मुंबई एपीएमसीद्वारे दरवर्षी १०,००० कोटी रुपयांहून अधिकची आर्थिक उलाढाल होते, जी संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात महत्त्वाची भूमिका बजावते. १९८२ साली मुंबईतून नवी मुंबई स्थलांतरित झालेली ही बाजारपेठ नवी मुंबई ओळख बनली असून, ही बाजार पेठ स्थलांतरित झाल्यास नवी मुंबईची ओळखच पुसली जाईल अशी चर्चा बाजार घटक आणि नागरिकांमध्ये आहे.
स्थलांतराचे परिणाम
- एपीएमसी स्थलांतरित केल्यास अनेक गुंतागुंतीच्या अडचणी उद्भवू शकतात.
- शेतकऱ्यांना नवीन ठिकाणी पोहोचण्याची अडचण होईल, परिणामी त्यांचे वाहतूक खर्च वाढतील.
- व्यापाऱ्यांना नव्या बाजारात पुन्हा आपली व्यवहार पद्धती उभी करावी लागेल.
- नवी मुंबई स्थायिक माथाडी व हमाल कामगारांचा रोजगार धोक्यात येईल.
- याशिवाय, पुरवठा साखळी व दररोजचा अन्न पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संकल्पना
नवीन कृषी कायद्यानुसार राज्य सरकारकडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवरच ही बाजारपेठ उभारायची की अन्य पर्यायांचा शोध घ्यायचा? याबाबत पडताळणी सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी माध्यमांना दिली.
यापूर्वी ग्रोथहब नियामक समितीच्या बैठकीत वाशीतील सुमारे १८० एकर च्या परिसरातील बाजारपेठेच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर महापालिकेला १०० एकरची पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, यावर व्यापारी वर्ग आणि माथाडी कामगार संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणामुळे मुंबई एपीएमसीच्या भवितव्याबाबत निर्माण झालेला संभ्रम काही अंशी दूर झाला असून, आगामी काळात व्यापारी, शेतकरी आणि माथाडी यांच्यासह सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे संकेत मिळाले आहेत.