Navi Mumbai International Airport / उरण – ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या विमानतळाच्या नामकरणासाठी ठाणे, रायगड, पालघर, मुंबईतील भूमिपुत्र प्रचंड आग्रही होते.

विमानतळाचे उद्घाटन होत असताना अजूनही दि.बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव पूर्णत्वास गेला नसल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये कमालीची अस्वस्था आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात तरी दि.बा. पाटील यांच्या नावाचा उल्लेख करावा अपेक्षा स्थानिक भूमिपुत्रांकडून केली जात आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सध्या मुंबई, नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरातील विमानतळाकडे येणाऱ्या मार्गांवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकांवर केवळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव लिहण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे विमानतळाच्या मुख्य मार्गावर ही अशाच प्रकारे उल्लेख असलेले फलक आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक भूमिपुत्रांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली आहे. या विरोधात काही ठिकाणी फलक उखडवून लावून नाराजीही व्यक्त केली गेली. तर समाजमाध्यमांतून या विषयी रोष व्यक्त करीत फलक पुसण्याची भाषा सुरू झाली आहे.

यातून भूमीपुत्र संताप व्यक्त करीत आहेत. त्यातूनच ही अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे. शेतकरी, भूमी पुत्र आणि प्रकल्प ग्रस्त यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे व त्यांना न्याय मिळवून देणारे माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी रायगड, ठाणे, पालघर तसेच मुंबई व नवी मुंबई या पाचही सागरी जिल्ह्यातील स्थानिक भूमी पुत्र रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे राज्य सरकारला नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी विधानसभा व परिषदेत ठराव करावा लागला. मात्र या ठरावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली नाही.

फलक का लावले

दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी ६ ऑक्टोबरला आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ३ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमि पुत्रांची मुंबईत बैठक घेऊन नाव देण्याच्या अडचणी स्पष्ट करीत विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणार याचा पुनरुच्चार केला. मात्र त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगीतले.

परंतु नाव निश्चित न होताच ठीक ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकामुळे भूमीपुत्र संभ्रमात आहे. जर नावच जाहीर झाले नाही. तर फलक का लावण्यात आले ? बुधवारी विमानतळाच केवळ उदघाटन होणार आहे तरीही दिशादर्शक फलकासाठी खर्च का करण्यात येत आहे. असेही प्रश्न आता प्रकल्प ग्रस्त विचारू लागले आहेत.

लढा अजून संललेला नाही

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सुरू करण्यात आलेला लढा आहे. जो पर्यंत केंद्र सरकार त्यांच्या नावाची अधिसूचना प्रसिद्ध करीत नाही. तो पर्यंत संपलेला नाही.अशी भूमिका सर्व पक्षीय नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी घेतली आहे. तर ६ ऑक्टोबरचा मोर्चा हा तात्पुरता स्थगित करण्यात असल्याचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी भूमिपुत्रांना आश्वासन दिले आहे असे असले तरी याची खात्री पटावी म्हणून उदघाटन कार्यक्रमाच्या वेळी नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधानांनी करून भूमिपुत्रांचा नावा बद्दलचा संभ्रम दूर करावा अशी मागणी केली जात आहे.