पालघर : पालघर जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रातील उन्नतीसाठी पोषक वातावरण तयार झाले असून शालेय स्पर्धेमधील विद्यार्थ्यांची कामगिरी मध्ये सुधारणा होऊन जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावे अशी आशा पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी व्यक्त केली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्हा क्रीडा शिक्षक सभा आयोजीत करण्यात आले होते. यावेळी पालघर जिल्ह्यातील ४५० क्रीडा शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

या शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या, शालेय क्रीडा स्पर्धांचा आराखडा मांडण्यात आला. या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये आश्रम शाळा जिल्हा परिषद शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी महोदय यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

क्रीडा विभागाची माहिती व ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या संकेतस्थळावरून पालघर जिल्ह्यामध्ये क्रीडा विभागामार्फत, राबविले जाणारे विविध उपक्रम, विविध योजना यांची माहिती दिली जाणार आहे. राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या वतीने राबविले जाणारे विविध उपक्रम तसेच चिडव युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे उपक्रम व योजना यांची माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी गिरीश एरणाक, अमृत घाडगे, मयूर कॉलम, जयवंती देशमुख, प्रितेश पाटील, चेतन मोरे, सरिता वळवी, प्रणवते गावंडे, जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा केंद्रप्रमुख व जिल्हा क्रीडा समन्वय तसेच निवृत्त क्रीडा शिक्षक यांनी या सभेमध्ये सहभाग नोंदविला होता.