नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नागपूरमध्ये चिंतन शिबीर आटोपून सात दिवस उलटले तरी त्याचे कवित्व अद्याप संपले नाही, चिंतनासाठी राष्ट्रवादीने संघभूमी नागपूरची निवड केल्याने पक्ष संघ-भाजपच्या जवळ जातो आहे काय अशी शंका व्यक्त केली जात होती ती शिबिरात पारित झालेल्या ‘नागपूर डिक्लेरेशन’मुळे खरी ठरली आहे. यात राष्ट्रवादीने भाजपसोबत युती अधिक बळकट करण्याची भूमिका उघडपणे घेतली आहे. या ठरावाने महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणात नवे संकेत दिले आहेत. त्यामुळे ‘नागपूर डिक्लेरेशन’ नेमके आहे तरी काय ? याची पक्ष कार्यकर्त्यात आहे.

दिल्लीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यक्रमात पक्षाच्या राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार यांनी घेतलेला सहभाग , त्यानंतर चिंतन शिबीरासाठी नागपूरची निवड करणे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या जवळ चालली अशी चर्चा सुरू झाली होती, शिबिरात राजकीय चिंतन करताना पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी मात्र पक्षाची विचारधारा ही फुले-शाहू-आंबेडकर यांचीच असल्याचे स्पष्ट केले.

पण ते करताना त्यांनी पक्षाच्या विचारधारेच्या अगदी विरुद्ध विचारधारा असलेल्या भाजपच्या जवळीकीची गरजही व्यक्त केली. मुळ पक्षापासून फारकत का घेतली याची कारणे कार्यकर्त्यांना सांगतांना त्यांनी राज्याच्या विकासासाठी आपण ही भूमिका घेतली असे, सांगितले. पण त्यातून त्यांचा सत्तेचाच मोह दिसून आला. आता सत्तेत राहायचे म्हणजे भाजपशी जुळवून घेणे आलेच. त्याचेच प्रतिबिंब म्हणजे ‘नागपूर डिक्लेरेशन’ हा ठराव होय.

सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांची सर्वाधिक बदनामी भाजपने केली. २०१४ -२०१९ या पाच वर्षाच्या भाजपच्या सत्ताकाळात दरवर्षी विधि्मंडळाच्या नागपूर अधिवेशना दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करून पवार यांची कोडीं केली.तीच भाजप आता अजित पवार यांना गोड वाटू लागली,असे प्रथमदर्शनी तरी ‘नागपूर डिक्लेरेशन’चा ठराव पाहून वाटते.

काय म्हणतो ठराव ?

‘नागपूर डिक्लेरेशन’ मध्ये भारतीय जनता पक्षासोबत आघाडी अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून भाजपसोबत एनडीएमधील स्वत: चा सहभागाला अधिक मजबूत करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणाच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षासोबतच्या असलेल्या युतीसाठी नव्याने बांधिलकी व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच राज्याच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाचे कौतुक करण्यात आले. उत्तम शासनसेवा पोहचवण्यासाठी प्रत्येक पातळीवर भाजपसोबत समन्वय अधिक मजबूत करण्याचा संकल्प या ठरावाव्दारे करण्यात आला.

ठरावाचा अर्थ काय ?vनागपूर डिक्लेरेशन’ हा ठराव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यातील जवळीक अधिकृतपणे आणि खुलेपणाने स्वीकारण्याचं दस्तावेजीकरण आहे.यातून अजित पवार गटाचा मुख्य उद्देश – सत्ता टिकवणं व भाजपसोबतची नातं मजबूत करणं – हा असल्याचं उघड होतं.

मात्र याही पेक्षा महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बाजूला करून त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करीत असल्याचे दिसून येते हे अधिक महत्वाचे ठरते. वास्तविक शिवसेनेतून शिंदेना फोडून, त्यांना मुख्यमंत्री करून त्यांच्या महत्वाकांक्षा भाजपनेचवाढवल्या. त्यामुळे २०२४ मध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यावर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा दर्शवली, हे भाजपला खटकले आणि त्यांनी शिंदेंचा पर्याय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत शोधला, ‘नागपूर डिक्लेरेशन’ हा त्याचाच परिपाक असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांच्या पूर्वीच्या भ्रष्टाचार प्र्करणावर बाळगण्यात येत असलेले मौन हे सुद्धा अधिक बोलके आहे.