पुणे : ‘सध्याच्या सरकारने सारासार विचार करून शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. ही मदत तुटपुंजी आहे, शेतकऱ्यांची थट्टा करणारे आहे, असे विरोधक म्हणत आहेत. मात्र, प्रत्येकानेच आत्मपरीक्षण, आत्मचिंतन केले पाहिजे. आपले सरकार असताना, आपण त्या पदावर असताना शेतकऱ्यांसाठी काय केले, याचे चिंतन करायला हवे,’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विकासकामांच्या पाहणीनंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाने काढलेल्या ‘हंबरडा मोर्चा’वर टीका केली.
पवार म्हणाले, ‘सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीआधी ३२ हजार कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आर्थिक मदत आणि धान्यवाटप करण्यात आले आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांना आवश्यकतेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने निधी देण्याचे निर्देश दिले आहेत.’
केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणाऱ्या मदत प्रस्तावाबाबत पवार म्हणाले, ‘केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला, की त्यात बदल करता येत नाही. मध्यंतरी हवामान खात्याने कोकण आणि समुद्र किनाऱ्यांच्या ठिकाणी वादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे आम्ही थांबलो होतो. आता सगळीकडून पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती येत आहे. खरडून गेलेल्या जमिनी, शेती, विहिरी, घरे अशा सर्व प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. हे पंचनामे ताबडतोब करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याची आकडेवारी आली, की सरकारकडून केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.’
पुरंदर विमानतळावर दोन धावपट्ट्या
पुरंदर विमानतळामुळे वाढलेल्या जमिनीच्या भावासंदर्भात लक्ष वेधले असता पवार म्हणाले, ‘पुरंदर विमानतळासाठी सुमारे ३ हजार एकर जमीन घेण्याचे सरकारने ठरवले होते. त्यानुसार जमिनीची खरेदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्वच शेतकऱ्यांची संमती मिळवली आहे. देशातील पहिल्या पाच विमानतळांमध्ये त्याचा समावेश व्हावा म्हणून तिथे दोन मोठ्या धावपट्ट्या उभारण्यात येणार आहेत.’
‘भान राखून विधाने करावी’
घायवाळ प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर केलेल्या टीकेबाबत अजित पवार म्हणाले, ‘आपण शिवसेनेत आहोत, हे धंगेकर यांच्या अद्याप लक्षात आलेले दिसत नाही. त्यांच्या पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतीत त्यांना सांगतील. अनेकदा कार्यक्रमांमध्ये छायाचित्रे काढताना नेत्यांना कुणाबरोबर छायाचित्रे काढत आहोत, याची कल्पना नसते. शेवटी, सगळेच काचेच्या घरात राहतात. महायुती म्हणून एकत्र काम करताना प्रत्येकाने त्याचे भान राखले पाहिजे. मित्रपक्षांबाबत विधाने करताना प्रत्येकानेच भान ठेवायला पाहिजे.’