पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोहोळ यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच आमदार महेश लांडगे, राहुल कुल, शंकर जगताप आणि गणेश बीडकर यांच्याकडेही निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. येत्या दोन डिसेंबरला जिल्ह्यातील १४ नगर परिषद, ३ नगरपंचायत निवडणुका होणार असून निवडणुकीसाठीचे वातावरण रंगण्यास सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये मोहोळ यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पुणे महापालिकेसाठी माजी सभागृहनेता गणेश बीडकर यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी असणार आहे. पुणे उत्तरसाठी (मावळ) आमदार महेश लांडगे आणि पुणे दक्षिणसाठी (बारामती) आमदार राहुल कुल यांच्या नावाच घोषणा करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या चारही ठिकाणी मुरलीधर मोहोळ निवडणूक प्रभारी असणार आहेत.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. विकासाभिमुख धोरणांची आखणी आणि त्याची वेगवान अंमलबजावणी हे केंद्र आणि राज्य सरकारचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर विश्वास दाखवतील. पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप, महायुतीच सत्तेवर येईल, अशी प्रतिक्रिया मोहोळ यांनी दिली.

राज्यात भाजप आणि महायुतीला अनुकूल वातावरण आहे. पुणे महापालिकेत २०१७-२२ या काळात भारतीय जनता पक्षाचीच सत्ता होती. या पाच वर्षात पुणे शहराच्या भाजपने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. यंदाही पुणेकर भाजप आणि महायुतीच्याच पाठीशी राहतील, याची मला खात्री असल्याचे बीडकर यांनी सांगितले.