Job Opportunity / पुणे : ‘युनेस्को’ने जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिलेल्या राज्यातील किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना माहिती देण्यासाठी मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या वर्षभरात ७ हजार ५०० स्थानिक युवक, युवतींना प्रशिक्षित करण्यात येणार असून, त्यासाठी नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
पर्यटन विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्याची समृद्ध संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक महत्त्व, विविध धार्मिक स्थळे आणि आधुनिक काळातील पर्यटनाच्या संधीमुळे देश-परदेशातील पर्यटक राज्यात आकर्षित होतात. ‘युनेस्को’मार्फत राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी हे ११ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेस बळकटी देणे, पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे व महाराष्ट्र राज्याला जागतिक स्तरावर एक नामांकित पर्यटन हब म्हणून नावारूपाला आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी राज्यातील पर्यटनस्थळी स्थानिक युवक-युवतींना आदरातिथ्य, मार्गदर्शक प्रशिक्षणासाठी नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
पर्यटन विभागाच्या निर्णयानुसार, राज्यातील पर्यटनस्थळी स्थानिकांना पर्यटन क्षेत्राशी निगडित आदरातिथ्य, विशेषतः युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेल्या किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना किल्ल्याच्या इतिहासाबद्दल खरी माहिती देणारे स्थानिक मार्गदर्शक तयार करण्यात येणार आहेत.
त्यासाठी नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत येत्या वर्षात ७ हजार ५०० स्थानिक युवक, युवतींना मार्गदर्शक आदरातिथ्य क्षेत्राशी निगडित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींना पर्यटन संचालनालयामार्फत प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशिक्षण कोणामार्फत?
मार्गदर्शक प्रशिक्षणाचा कार्यक्रम पर्यटन संचालनालयामार्फत ग्वाल्हेर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट या आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रातील नामांकित प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने, तसेच पर्यटन संचालनालयाच्या अधीनस्त सोलापूर येथील श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत राबवण्यात येणार आहे.