पुणे प्रतिनिधी : राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती पावलं उचलली जात आहे. तर पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळत असून सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे धरण साठ्यात कमालीची वाढ होताना दिसत असून आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत चार ही धरणात मिळून 28.35 टीएमसी साठा तर 97.58 टक्के इतके धरण भरले आहे. त्याचबरोबर धरण साखळीमध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने 29 हजार 84 क्युसेक पाण्याचा विसर्ग सायंकाळी पाच वाजता नदी पात्रात सोडण्यात आला आहे. या एकूणच सध्याच्या परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी वर्गाची बैठक झाली.

बैठकीमध्ये जितेंद्र डुडी म्हणाले,पुणे जिल्ह्यात धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बाधित होणारे पुरग्रस्त भाग तसेच दरडप्रवण भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थालंतर करावे, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व संबधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश त्यांनी अधिकारी वर्गाला दिले.

तसेच भारतीय हवामान खात्याने आज (दि.19 ऑगस्ट) आणि उद्या (दि. 20 ऑगस्ट) रोजी घाटमाथा परिसरात रेड अलर्ट तर शहर आणि ग्रामीण भागात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जी धरणे भरली आहेत. त्या ठिकाणी जलसंपदा आणि शासकीय यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे.

जलसंपदा विभागाने पाऊसाचा अंदाज आणि त्यांनी धरणातील आवक लक्षात घेता विसर्गाबाबत नियोजन करावे.याबाबत किमान दोन तास अगोदर जिल्हा नियंत्रण कक्षास कळवावे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सैन्यदलानी आपली पथके सुसज्ज साहित्यासह दक्ष ठेवावे. नदीकाठच्या लोकांना ज्या ठिकाणी धोका पोहोचण्याची शक्यता आहे, त्यांना सावध करण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत संदेश पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.