डोंबिवली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल साडीच्या वेशातील प्रतिमा समाज माध्यमांत प्रसारित करून पंतप्रधान मोदी यांची बदनामी, त्यांच्या विषयी व्देष भावना, समाजात शत्रूत्व निर्माण करणाऱ्या काँग्रेसचे डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांच्यावर कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार केली. पोलिसांनी या तक्रारीवरून मामा पगारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या तक्रारीच्या एक दिवस अगोदर मामा पगारे यांनी भर रस्त्यात डोंबिवलीत गोग्रासवाडी भागात आपणास भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळी, दत्ता मयेकर आणि इतर २० जणांनी साडी नेसवली म्हणून टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली.
या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, माळी आणि मयेकर यांच्या विरुध्द मामा पगारे यांची सार्वजनिक ठिकाणी बदनामी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांची समाज माध्यमांवर बदनामीकारक प्रतीमा प्रसारित केली म्हणून मामा पगारे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांविरुध्द ॲट्राॅसिटीची गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रसेचे मामा पगारे, काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, काँग्रेस पदाधिकारी ॲड. नवीन सिंग, नवेंदू पाठारे यांची मागणी होती. पोलिसांनी याविषयीच्या सबळ पुराव्याची मागणी करून भाजप पदाधिकाऱ्यांविरुध्द ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही.
या परस्पर विरोधी तक्रारीवरून डोंबिवली, कल्यामध्ये भाजप, काँग्रेसमध्ये तप्त वातावरण आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सोमवारी सकाळी मी भाजप कार्यालयात बसून आपल्या मोबाईलवर समाज माध्यमातील मजकूर पाहत होतो. त्यावेळी आपणास फेसबुक पानावर प्रकाश पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साडी नेसलेली प्रतिमा प्रसारित केली होती.
या प्रतिमेमध्ये मोदी लाल साडी वेशात, कानात सफेद फूल आणि शुभ्र लांब डोक्यावर केस वेशात दाखविण्यात आले होते. या प्रतिमेखालील मजुकरात माफ मरा तरुणींनो मलाही पण प्रसिध्दीच्या झोतात राहण्यास आवडते, असा इमोजी सामाईक केला होता. तसेच, या प्रतिमेसोबत ‘मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग’, असे गाणे प्रदर्शित केले होते.
प्रकाश पगारे यांनी समाज माध्यमांवर हा प्रसारित केलेला प्रकार पाहून आपणासह ही प्रतिमा पाहिलेल्या भाजप नेते, पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रतिमेमुळे प्रादेशिक गटात, समाजात, वंशामध्ये द्वेषाची, शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, या प्रतिमेच्या माध्यमातून महिला वर्गाची बदनामी करण्याचा प्रयत्न कला. त्यामुळे आपली प्रकाश पगारे यांच्या विरुध्द तक्रार आहे, असे जिल्हाध्यक्ष परब यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या सन २०२३ च्या ३५३(२), ३५६ कलमान्वये मामा पगारे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करून घेतला आहे.