ठाणे : धर्माच्या नावावर निवडून येतात. परंतू, आम्ही हिंदू आहोत असे म्हणून हिंदूंच्या सर्व सणांचा बट्ट्याबोळ करून टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आमच्या काळातही कायदे होते, तरी लोकांना सण आनंदाने साजरा करण्याची मुभा दिली होती, असेही ते म्हणाले.

ठाणे महानगरपालिकेच्या गणेश विसर्जन व्यवस्थेवर बोलताना आव्हाड म्हणाले की, लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती विसर्जन करून श्रद्धेशी खेळ केला जात आहे. “खाड्या सांडपाणी आणि अनधिकृत बांधकामांमुळे प्रदूषित झाल्या आहेत. परंतू, त्यावर आवाज उठवला जात नाही. पण, आता विसर्जनाच्या नावावर नागरिकांच्या भावनांचा अपमान केला जात आहे. सिव्हरेज वर्षानुवर्ष त्या खाडीत सोडतात त्याबद्दल बोला, तुमच्यामुळे खाडीचे बारा वाजले त्याबद्दल बोला, अनधिकृत बांधकामामुळे खाडीचा नाला झाला त्यावर बोला सत्ताधाऱ्यांनी नालाचा जे वाटोळे केले त्यावर बोला ठाण्याची मोठी खाडी नाला झाली त्याला जबाबदार सरकार आहे, अशी संतप्त टीका आव्हाडांनी पत्रकारांशी बोलताना केली.

टेंभी नाक्याची देवी तलावात विसर्जन केली तर…

टेंभी नाका देवी विसर्जनाबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, टेंभीनाक्याची देवी तलावाच्या मध्यभागी नेऊन विसर्जन करतात हे कसे चालते ? तुम्हाला सगळे कायदे माफ लोकांना सगळे कायदे लागू हे बरोबर नाही, सर्वसामान्य माणूस देखील माणूस आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे, परंतु त्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. लोकांच्या भावनांशी खेळून लोखंडी टाक्यांमध्ये मूर्ती टाकण्याची पद्धत चुकीची आहे,” असे आव्हाड म्हणाले.

भांडवलदारांचे राज्य म्हणजे कामगारांचे शोषण

“भांडवलदारांनी राज्य व्यवस्था ताब्यात घेतली की कामगारांचे शोषण सुरू होते. आपल्या घामातून जग उभे करणारा कामगार हा राष्ट्राचा आधार आहे. कामगारांना अंगावर घेऊ नका, कारण तेच जगातील सर्वात मोठे बळ आहेत,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी आठ तासांचा कामाचा कालावधी व रविवारची सुट्टी दिली होती. त्यामागे सखोल संशोधन होते. मात्र आज कामगारांकडून १२ ते १३ तासांची अपेक्षा केली जाते.

“प्राण्यालाही विश्रांती लागते, मग माणसाला का नाही? जास्तीच्या तासांमुळे कामगारांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत, आजार वाढत आहेत आणि कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होत आहे,” असे आव्हाड म्हणाले. सरकारकडे कामगारांकडे माणूस म्हणून पाहण्याची दृष्टीच नाही. ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने शासन चालते आहे, अशी टीका आव्हाडांनी केली आहे.